
डोंबिवली पोलिसांनी आंतरराज्य सराईत चोरांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेले चोरटे उत्तर प्रदेशमधील असून आरोपींनी महाराष्ट्रातील पुणे, ठाणे जिल्ह्यासह उत्तर प्रदेशमध्ये धुमाकूळ घातला होता. सुनीलनगर परिसरात सापळा रचत आरोपींना अटक करण्यात आली.
अभय गुप्ता, अभिषेक जौहरी, अर्पित उर्फ प्रशांत शुक्ला अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे, एक चोरी केलेली दुचाकी जप्त केली आहे. चेन स्नॅचिंग करण्यासाठी हे तिघे दुचाकी चोरी करायचे व या चोरलेल्या दुचाकीने नागरिकांचे विशेषतः वृद्ध महिलांचे लक्ष विचलित करून त्यांना लुटायचे.
सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा माग
ठाकुर्ली येथील ९० फिट रोड येथून पायी जाणाऱ्या एका वृद्ध महिलेची सोन्याची चेन हिसकावण्यात आली होती. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी पोलिसांची दोन पथके तयार करत सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा माग घेतला.