T20 World Cup 2024 – टी-20 वर्ल्ड कप आयोजनातून डॉमिनिकाची माघार

अवघ्या काही महिन्यांवर टी-20 विश्वचषक येऊन ठेपलेला असताना कॅरेबियन बेटावरील डॉमिनिका या देशाने टी-20 विश्वचषकाच्या आयोजनातून माघार घेतल्याने आयसीसीची डोकेदुखी वाढली आहे. 4 जूनपासून वेस्ट इंडीज आणि अमेरिका या दोन ठिकाणी टी-20 वर्ल्ड कप आयोजित केला जाणार आहे. अवघ्या सहा महिन्यांवर वर्ल्ड कप येऊन ठेपलेला असताना कॅरेबियन बेटावरील डॉमिनिकाने माघार घेतल्याने आयोजनात फेरबदल होण्याची शक्यता आहे. याबाबत डॉमिनिकाचे संस्कृती, युवा आणि क्रीडामंत्र्यांनी याबाबत गुरुवारी घोषणा केली.

टी-20 विश्वचषकाला अवघे सात महिने शिल्लक असून स्पर्धेसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि मैदाने डॉमिनिका सरकार पूर्ण करू शकत नसल्याचे कारण देत त्यांनी आयोजनातून काढता पाय घेतला आहे. डॉमिनिकामधील विंडसोर पार्क स्टेडियमवर टी-20 विश्वचषकातील सामने रंगणार होते. या मैदानावर ग्रुप स्टेजमधील एक आणि सुपर-8 मधील दोन सामने खेळवले जाणार होते. ठरलेल्या वेळेमध्ये मैदानाचे नूतनीकरण करणे शक्य नसल्याचे डॉमिनिकाच्या सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.