
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत होणारे स्थलांतर रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून कठोर पावले उचलली आहेत. ट्रम्प यांनी काही देशांतील नागरिकांवर अमेरिकेत प्रवास करण्यास बंदी घातली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘व्हाईट हाऊस’कडून सांगण्यात आले आहे. अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे आणखी 20 देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवास करणे अशक्य झाले आहे. सीरिया, बुर्किना फासो, माली, नायजर, दक्षिण सुदान, लाओस व सिएरा लिओन या देशांचा समावेश आहे. 1 जानेवारीपासून हा निर्णय लागू होणार आहे.
26 नोव्हेंबर रोजी वॉशिंग्टन डीसी इथे ‘व्हाईट हाऊस’जवळ दोन सैनिकांवर गोळीबार झाला होता. एका अफगाणी नागरिकाने हा गोळीबार केला. त्यानंतर ट्रम्प यांनी 12 देशांतील नागरिकांच्या अमेरिका प्रवासावर बंदी घातली होती. त्यात अफगाणिस्तानचा समावेश होता. या घटनेनंतर ट्रम्प यांनी स्थलांतरितांसाठी नियम आणखी कडक केले आहेत. अमेरिकेने यापूर्वी बंदी घातलेल्या देशांमध्ये अफगाणिस्तान, बर्मा, चाड, रिपब्लिक ऑफ काँगो, इक्वेटोरिअल गिनिआ, हैती, इरित्री, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान व येमेन या देशांचा समावेश आहे.




























































