
मध्य पूर्वेतील युद्धाला महिना पूर्ण होत असताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांमध्ये तंबी दिली आहे. इराणने लवकरात लवकर चर्चेबाबत गंभीर व्हावे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि त्याचे परिणाम भीषण असतील, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला हा अल्टिमेटम दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रुथवर पोस्ट शेअर केली आहे. ते म्हणाले, इराणी वाटाघाटी करणारे लोक अत्यंत विचित्र आहेत. ते पडद्यामागे करारासाठी गयावया करत आहेत, मात्र उघडपणे वेगळेच भासवतात. त्यांनी लवकर गांभीर्य दाखवावे, कारण एकदा वेळ निघून गेली की ‘नो टर्निंग बॅक’ असेल. हे चित्र अजिबात चांगले नसेल. यावेळी ट्रम्प यांनी नाटो देशांनाही खर्चाचा वाटा उचलण्यावरून खडे बोल सुनावले आहेत.
Israel Iran War – अमेरिकेचा खतरनाक प्लॅन तयार; इराणमध्ये सैन्य उतरवण्यावर विचार सुरू
दरम्यान, अमेरिकेने पाकिस्तान आणि सौदीच्या माध्यमातून इराणला 15 कलमी युद्धबंदीचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र इराणने हा प्रस्ताव फेटाळून लावला. युद्धबंदी आमच्या अटींवर होईल असे स्पष्ट करत इराणने अमेरिकेसमोर पाच अटी ठेवल्या होत्या. त्यानंतर ट्रम्प यांनी इराणला अंतिम इशारा दिला आहे.
5 देशांसाठी होर्मुझचा मार्ग खुला
जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणने आपली पकड घट्ट केली आहे. इराण येथून जाणाऱ्या जहाजांवर निर्बंध घालत असून, काही जहाजांकडून सुरक्षित प्रवासासाठी चिनी युआनमध्ये शुल्क वसूल केले जात असल्याचे वृत्त आहे. तसेच इराणने हिंदुस्थानसह 5 देशांसाठी होर्मुझचा मार्गही खुला केला आहे.


























































