
सामना प्रतिनिधी । पाथर्डी
पाथर्डी तालुक्यातील क्षेत्र मोहटादेवी येथील शारदीय नवरात्र महोत्सवा काळात मोहटा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या राज्यभरातील भाविकांनी दानपेटीत तब्बल 1 कोटी 35 लाख रुपयांचे भरघोस दान केले. दोन टप्यात करण्यात आलेल्या या मोजणीत देवस्थान समितीचे अध्यक्ष अशोककुमार भिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे विश्वस्त,रेणुका विद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते.
श्री क्षेत्र मोहटादेवी येथील पंधरा दिवसांचा नवरात्र उत्सव संपल्यानंतर भाविकांनी दानपेटीत टाकलेल्या रोख रक्कमेची व सोन्या-चांदीची मोजदाद मंदिराच्या मुख्य हॉल मध्ये करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे, देवस्थान समितीचे विश्वस्त डॉ.हर्षवर्धन पालवेसह आदी उपस्थित होते.
नवरात्र उत्सव कालावधीत दानपेटीतील, मुखवटा मिरवणूक, देवीला गंगेच्या पाण्याने अंघोळ घालतेवेळी, पालखी मिरवणूक, रोख देणगी स्वरूपात मिळणारी रक्कम आदींच्या माध्यमातून रक्कम देवस्थानाकडे जमा होते. या रक्कमेची नुकतीच मोजदाद करण्यात आली. त्यामध्ये दानपेटीतून व रोख स्वरूपात 1 कोटी 17 लाख 85 हजार रुपये, 350 ग्रॅम सोने, चौदा किलो चांदी असे सर्व मिळून 1 कोटी 35 लाख रुपयांचे दान भाविकांनी टाकले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी भाविकांची गर्दी जरी कमी झाली असली तरी यावर्षी देवस्थानचे उत्पन्न साडे सात लाखांनी वाढले आहे.
































































