हरयाणात गाढविणीच्या दुधाची डेअरी, एका लिटरला मोजा 7000 रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
donkey-1

डेअरीवर गेलात तर तुम्हाला गाईचे, म्हशीचे दूध मिळेल. काही ठिकाणी शेळीचे दूधही मिळू शकेल. पण गाढविणीचे दूध मिळवणे म्हणजे दिव्यच. त्यासाठी कदाचित हरयाणा गाठावे लागेल. कारण गाढविणीच्या दुधाची देशातील पहिली डेअरी हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात सुरू होत आहे. गाढविणीच्या एका लिटर दुधासाठी सात हजार रुपये मोजावे लागणार आहेत.

राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्राच्या (एनआरसीई) पुढाकाराने ही डेअरी सुरू केली जात आहे. या डेअरीसाठी गुजरातच्या हलारी जातीच्या दहा गाढविणी मागवण्यात आल्या आहेत. त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रजनन केले जात आहे. ही डेअरी सुरू करण्यासाठी अश्व संशोधन केंद्राने हिसार येथीलच केंद्रीय म्हैस संशोधन केंद्र आणि करनाल येथील राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेची मदत घेतली आहे.

दोन ते सात हजार रुपये लिटर

हलारी जातीच्या गाढविणी या गुजरातमध्ये आढळतात. या गाढविणींच्या दुधापासून औषधे बनवली जातात. हलारींच्या दूधामध्ये कर्करोग, लठ्ठपणा, ऍलर्जीसारखे आजार बरे करणारी तत्वे असतात. तसेच त्या दुधाने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. हलारी गाढविणीचे दूध दोन हजार ते सात हजार रुपये लिटर विकले जाते. त्या दुधामध्ये फॅट्सही अत्यल्प असतात.

सौंदर्य प्रसाधने बनवण्यासाठीही वापर

गाय किंवा म्हशीचे दूध पाजल्याने अनेकदा लहान मुलांना ऍलर्जीची तक्रार उद्भवते. हलारी गाढविणीच्या दूधाने ऍलर्जी होत नाही. या दूधात ऍण्टीऑक्सीडेंट, ऍण्टी एजिंग तत्वे असतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या गंभीर आजारांपासून शरीराला रोगप्रतिकारक शक्ती मिळते असे एनआरसीईच्या वरिष्ठ संशोधक डॉ. अनुराधा भारद्वाज सांगतात. डॉ. अनुराधा यांनी हलारींच्या दुधापासून सौंदर्य प्रसाधनेही बनवली आहेत. केरळमधील एका कंपनीने त्यांचे तंत्रज्ञान विकत घेऊन त्यापासून साबण, लिपस्टीक, बॉडी लोशनही बनवले.