
बदलती जीवनशैली, कामाचा ताण, नैराश्य, वाईट जीवनशैली आणि चिंता यामुळे डोकेदुखीची समस्या खूप वाढली आहे, परंतु सतत डोकेदुखी होत असेल आणि ही समस्या दररोज जाणवत असेल तर निष्काळजीपणा करू नका. कारण डोकेदुखी हे ब्रेन टय़ुमरसारख्या गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. 8 जून रोजी ‘वर्ल्ड ब्रेन टय़ुमर डे’ आहे. यानिमित्ताने झायानोव्हा शाल्बी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे न्युरोलॉजिस्ट डॉ. आकाश छेडा यांनी या आजाराबाबत केलेली जनजागृती.
मायग्रेनसारख्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांना ब्रेन टय़ुमर होण्याचा धोका असतो. अनेक वेळा मायग्रेनच्या दुखण्याकडे लोक दुर्लक्ष करतात, पण वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
तज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, देशात ब्रेन टय़ुमरची प्रकरणे वाढत आहेत. या आजाराचे वेळीच निदान आणि उपचार केले नाही, तर तो जीवघेणा ठरू शकतो. मेंदूतील टय़ुमरच्या रुग्णांमध्ये डोकेदुखी हे एक सामान्य लक्षण आहे. अनेकदा सामान्य डोकेदुखी असलेल्या रुग्णांना ब्रेन टय़ुमरचा धोका असतो, परंतु लोकांना होत असलेली डोकेदुखी सामान्य वेदना, मायग्रेन वेदना किंवा ब्रेन टय़ुमर वेदना हे ओळखणे कठीण आहे. या वेळी लोकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे. ब्रेन टय़ुमर हा सहसा 40 ते 60 वयोगटातील लोकांवर परिणाम करतो.
ब्रेन टय़ुमर की मायग्रेन वेदना
मायग्रेनमुळे डोक्याच्या एका बाजूला वेदना होतात, पण जर एखाद्याला सकाळी लवकर डोकेदुखी होत असेल आणि त्यासोबत उलटय़ा होत असतील तर ते ब्रेन टय़ुमरचे लक्षण असू शकते. मळमळ, उलटय़ा, निद्रानाश, मूड बदलणे, बोलणे आणि ऐकू न येणे, वास बदलणे ही ब्रेन टय़ुमरची लक्षणे आहेत.
जेव्हा मेंदूच्या वाढत्या टय़ुमरमुळे मेंदूभोवतीच्या निरोगी पेशींवर दबाव येतो तेव्हा डोकेदुखी होते किंवा ब्रेन टय़ुमरमुळे मेंदूला सूज येऊ शकते. ज्यामुळे डोक्यावर दबाव वाढतो, डोकेदुखी होते. ही डोकेदुखीदेखील मायग्रेनच्या वेदनांसारखी जाणवते. इतकेच नाही तर डोक्याच्या मागच्या भागात असलेल्या ब्रेन टय़ुमरमुळेही मान दुखू शकते. डोक्याच्या पुढच्या भागात ब्रेन टय़ुमर झाला असेल तर डोके दुखणे किंवा सायनस दुखणे यांसारखी डोकेदुखीदेखील जाणवते. अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
ब्रेन टय़ुमरचे कोणतेही निश्चित कारण सापडलेले नाही. मात्र निरोगी जीवनशैली तुम्हाला यापासून काही प्रमाणात दूर ठेवू शकते. यासोबतच त्याच्या लक्षणांबाबतही जागरूकता असणे आवश्यक आहे. वारंवार डोकेदुखी आणि उलटय़ा होण्याच्या तक्रारी असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

































































