शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरू नका! युवासेनेचे राज्यतंत्र शिक्षण मंडळाच्या संचालकांना पत्र

यूजीसीकडून महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये दिवंगत दत्ताजी डिडोळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नियम धाब्यावर बसवून राजकीय भूमिका घेतली असताना आता महाराष्ट्रातील मिंधे सरकारने सरकारी कार्यक्रमांना गर्दी जमवण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरले आहे. रत्नागिरी शासकीय तंत्र निकेतनच्या प्राचार्यानी सरकारी कार्यक्रमाला गर्दी व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना साध्या कपडय़ात उपस्थित राहण्यासाठी काढलेले पत्रक हे घटनाबाह्य असून असा आदेश काढणाऱया प्राचार्यांवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी युवासेनेचे सचिव साईनाथ दुर्गे यांनी राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या संचालकांकडे केली आहे.

रत्नागिरीतील शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी लोटे एमआयडीसीमध्ये होणाऱया सरकारी कार्यक्रमासाठी मंगळवार, 28 नोव्हेंबरला प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी साध्या वेशात उपस्थित राहण्याचे पत्रक काढले. जे विद्यार्थी उपस्थित राहणार नाहीत त्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट वितरीत केले जाणार नाही, त्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही, अशी गर्भित धमकीच या पत्रकात प्राचार्यांनी दिली होती. हा प्रकार संतापजनक असून शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरणारा आहे. याबाबत युवासेना रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रसाद सावंत यांनी प्राचार्यांकडे आक्षेप नोंदवला, मात्र त्यानंतर प्राचार्यांकडून कोणतेही संयुक्तिक कारण देण्यात आलेले नाही. आधी विद्यापीठे, तर आता शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा हा चुकीचा पायंडा पाडू नका आणि चुकीचे पत्रक काढणाऱया प्राचार्यांची चौकशी करून त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेचे सचिव साईनाथ दुर्गे यांनी राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या संचालकांकडे केली आहे.