
सध्याच्या दिवसात साधा सर्दी-ताप-खोकल्याची लक्षणे आढळून आली तरी सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रचंड भीती निर्माण होते. साधा ताप आला तरी कोरोनाची लागण झाली असे समजून काहीजण मेडिकल स्टोअरमध्ये स्वतःच्याच सल्ल्याने औषधे विकत घेत आहे. कोरोनाचा शिक्का टाळण्याबरोबरच सरकारी रुग्णालयात जाऊन औषधोपचार नको या भीतीने अनेकजण औषधाच्या दुकानात जाऊन स्वतःच औषधे विकत घेऊन स्वतःवर उपचार करीत असल्याचे मुंबईतल्या खासगी डॉक्टरांना आढळून आले आहे.
सध्याच्या इंटरनेटच्या युगात अनेकजण वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन एखादा आजार व त्यावरील औषध उपचारांची माहिती करून घेतात. अनेकदा ऑनलाईन औषधही मागवतात. सध्याच्या दिवसातच तर इंटनेटवर सर्च करून औषधांची खास करून कोरोनावरील उपचार व औषधांची माहिती करून घेत आहेत. पण अशा प्रकारे सेल्फ मेडिकेशन आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे डाँक्टर सांगतात.
पेनकिलर धोकादायक
अनेकजण जाहिराती पाहून पेनकिलर(वेदनाशामक) घेतात. वास्तविक जाहिरातीमध्ये दाखवलेले कोणतेही पेनकिलर कोणत्याही दुखण्याला चालू शकत नाही. काही औषधे विशिष्ट आजाराच्याच रुग्णाला दिले जाते.चुकीचे औषध घेतले तर रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वेदनाशामक औषधांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले जाते.
अर्धवट उपचार नको
प्रत्येक औषधाचा किती व कधीपर्यंत डोस घ्यायचा याची मुदत डाँक्टर ठरवून देतात. पण सेल्फ मेडिकेशनमध्ये अनेकजण थोडे बरे वाटू लागल्यावर औषधे घेण्याचे बंद करतात. वास्तविक ठराविक दिवसांपर्यंत औषधांचा डोस घेतला नाही तर आजार पुन्हा बळावण्याची शक्यता असते. काही आजारांमध्ये तर औषधे दीर्घकाळासाठी तर काही आजारांमध्ये आयुष्यभऱ औषधांचे सेवन करावे लागते. पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेतली तर त्याचे दीर्घकाल दुष्परिणाम होऊ शकतात.
डॉक्टरांचा सल्ला आवर्जुन घ्या
कोरोनाची लक्षणे अनेकदा साध्या फ्ल्यू तापासारखी असतात. त्यात श्वसनाचाही त्रास होऊ शकतो. कोरोना विषाणुमुळेही सर्दी-खोकल्याची लक्षणे आढळतात. त्यामुळे सेल्फ मेडिकेशनचा प्रयत्न करू नये. कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नये असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिशन महाराष्ट्र राज्याच्या ऍक्शन कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे यांनी केले आहे.
मेडिकेशन घातक
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली औषधे अतिशय घातक ठरू शकतात. कधी तरी सेल्फ मेडिकेशनचा प्रकार जीवावर बेतू शकतो.
सेल्फ मेडिकेशनसाठी इंटरनेट
आता इंटरनेटच्या युगात अनेकजण एखाद्या वेबसाईटवर जाऊन स्वतःच औषधे घेतात. कारण डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन वेळ कशाल वाया घालवा किंवा दवाखान्यात शेजारी बसलेल्या रुग्णाचा संसर्ग नको म्हणून इंटरनेटवर औषधे शोधतात. वेळ वाचवण्यासाठी स्वतःच इंटरनेटवर औषधे शोधून निदान करणे अनेकांना सोयीचे वाटत. पण हा प्रकारही जीवावर बेतू शकतो
सेल्फ मेडिकेशन म्हणजे काय
एफडीएने डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय अनेक औषधे देण्यास बंदी घातली आहे. पण तरीही अनेक जण औषधांच्या दुकानात जाऊन स्वतःच्या आजारावर स्वतःच औषधे घेतात. त्याला सेल्फ मेडिकेशन म्हणेजच स्व-औषधोपचार म्हणतात.

























































