‘रामायण’, ‘महाभारत’नंतर आणखी एक प्रचंड गाजलेल्या मालिकेचे पुनःप्रसारण होणार, दूरदर्शनने दिली माहिती

8174

रामानंद सागर निर्मित ‘रामायण’ आणि बीआर चोप्रा निर्मित ‘महाभारत’ या मालिकांचे दूरदर्शनवर सध्या पुनःप्रसारण सुरू आहे. लॉकडाऊनचा काळ लक्षात घेता सुरू केलेल्या या मालिकांमुळे दूरदर्शनचा टीआरपी प्रचंड वाढला आहे. सध्या टीआरपीमध्ये ‘रामायण’ ही मालिका टॉपवर असून जुन्या पिढीसह नवीन पिढीचे लोकही टीव्हीसमोर बसलेले दिसतात. या दोन धार्मिक मालिकांच्या यशस्वी पुनःप्रसारणानंतर आता नव्वदच्या दशकात गाजलेली एक धार्मिक मालिका पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय दूरदर्शनने घेतला आहे.

नव्वदच्या दशकात गाजलेली ‘श्रीकृष्णा’ ही धार्मिक मालिका दाखवण्याचा निर्णय दुरदर्शनने घेतला आहे. याबाबत ट्विट करून माहिती देण्यात आली आहे. मात्र अद्याप या मालिकेच्या पुनःप्रसारणाच्या वेळेबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. आमच्या दर्शकांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच आम्ही ‘श्रीकृष्णा’ या धार्मिक मालिकेचे पुनःप्रसारण करणार आहोत, या अनुषंगाने दूरदर्शन आणि प्रसार भारतीने ट्विट केले आहे.

‘श्रीकृष्णा’ ही धार्मिक मालिका देखील रामानंद सागर यांनीच निर्मित केलेली आहे. 1993 ते 1996 या काळात या मालिकेचे प्रसारण करण्यात आले होते. तर 1999 ला झी टीव्ही, 2001 ला सोनी आणि स्टार टीव्ही यांनीही या मालिकेचे प्रसारण केले होते.

सर्वदमन बनर्जी यांनी या मालिकेत श्रीकृष्ण आणि भगवान विष्णू यांची भूमिका साकारली होती. तर स्वप्नील जोशी याने तरुणपणीचा श्रीकृष्ण साकारला होता, तर बालकृष्णाच्या भूमिकेत अशोक कुमार दिसले होते. दीपक देऊलकर यांनी बलराम आणि शेषनागची भूमिका साकारली होती. तर पिंकी पारीखने रुक्मिणी, यमुना, लक्ष्मी, दुर्गा यांची भूमिका आणि राधाची भूमिका रेशमा मोदी यांनी केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या