जीवघेणी ढगफुटी आणि डॉप्लर रडार

785

>> किरणकुमार जोहरे

पाऊस पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे. वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने (संपृक्त झाल्याने) पाऊस पडतो. पृथ्वीवर दरवर्षी साधारण 505,000 घन किमी पाऊस पडतो. त्यातील 398,000 घन किमी पाऊस समुद्रावर पडतो. 

मुंबईत 4 सप्टेंबरला 12 तासांत 350 मिलीमीटर पेक्षाही जास्त पाऊस कोसळला आणि ढगफुटी झाली. सकाळी 9 ते 10 या वेळात नवी मुंबई व पनवेल परीसरात 100 मिलीमिटरपेक्षा जास्त पाऊस कोसळला आणि ढगफुटी झाली तरी हवामान खाते नेहमीप्रमाणे उशिरा जागे झाले. दुपारनंतर पत्रकार परिषद घेऊन मुंबई, ठाणे आणि कोकणात रेड ऍलर्ट जारी करून आधीच ढगफुटीने बेजार झालेल्या मुंबईकरांचा अजून अंत पाहिला. मुंबईला 26 जुलै 2005 रोजी 944 मिलीमीटर पाऊस होत ढगफुटी झाली होती. त्यामुळे मुंबईकरांना अशा पावसाच्या धोक्यांपासून वाचविण्यासाठी, जीवित, वित्तहानी टाळण्यासाठी डॉप्लर रडार आवश्यक आहे असे मत मांडले गेले. मात्र कुलाबा येथे हवामान खात्याने बसविलेले रडार मुंबईकरांच्या वेदना जराही कमी करू शकलेले नाही. हे डॉप्लर रडार 5 सप्टेंबरला बंदही पडले. तांत्रिक अडचणीमुळे ते बंद पडल्याचे कळले.

100 मिलीमीटर प्रति तास असा पाऊस झाला तर तो ‘ढगफुटी’मध्ये मोडतो. इंग्रजीत त्याला ‘क्लाऊड बस्ट’ म्हणतात असा अधिकृत उल्लेख हवामान खात्याच्या अनेक अहवालात आहे. हिंदुस्थानी हवामानशास्त्र विभागाच्या संकेतस्थळावरदेखील तो तसा 2010 सालापर्यंत उपलब्ध होता. महाराष्ट्रात ढगफुटी झाली तरी त्यासाठी अतिवृष्टी असा शब्दप्रयोग करून हवामान खाते त्याचे गांभीर्य कमी करते. शिवाय ढगफुटी झाली की हा 24 तासांत झालेला पाऊस आहे, असे सांगून हवामान खाते त्याची तीव्रता कमी करून नागरिकांची दिशाभूल करत आपली जबाबदारी झटकत आहे. हवामान विभागाकडून ढगफुटीची लपवाछपवी करण्यामागे काही निश्चित हेतू आहे. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे ढगफुटी मान्य केली तर त्याची आगाऊ सूचना का दिली नाही, असा थेट प्रश्न नागरिक विचारू शकतात याची धास्ती हवामान संशोधन केंद्राला असावी. ढगफुटीची सूचना देण्यासाठी या अत्याधुनिक  रडार यंत्रणेने काय काम केले याचा आढावा देण्याची हवामान खात्याला गरज भासत नाही.

डॉप्लर रडार ही पावसाची खात्रीशीर माहिती देणारी आपत्कालीन यंत्रणा आहे. अचूक हवामान माहिती देण्यासाठी तिचा वापर जगभर सर्रासपणे केला जातो. डॉप्लर रडार विद्युत चुंबकीय लहरी ढगावर सोडते. ढगांकडून परतणाऱया लहरी ढगाची एक्स-रेप्रमाणे इत्थंभूत माहिती आणतात. डॉप्लर रडार ढग सरकत असतानाही अचूक माहिती देते. डॉप्लर रडारच्या सहाय्याने पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची माहिती सहा ते चार तास आधी मिळू शकते. 250 किलोमीटरपर्यंतच्या परिघात पाऊस, गारपीट किंवा ढगफुटी कुठे कुठे होणार हे किमान एक तास आधी 100 टक्के खात्रीपूर्वच अचूक सांगता येते. डॉप्लर रडार यंत्रणेने तो कुठे आणि किती होईल याची माहिती मिळाल्यास प्रशासनाला मिळाल्यास आपत्कालीन ऍलर्ट देणे शक्य होईल आणि जीवित तसेच वित्तहानी टाळणे खात्रीने शक्य होईल.

डॉप्लर रडार पावसाचे अचूक व खात्रीशीर पूर्वानुमान जाणून घेण्याचे उत्तम तंत्र समजले जाते. विद्युत चुंबकीय लहरींचा, मोकळ्या आकाशाच्या हवेच्या बदलांची अचूक माहिती (1 ते 2 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), जवळच्या व दूरच्या ढगांच्या अचूक माहिती (2 ते 4 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), परदेशात खासगीटीव्ही चॅनल्स अति जवळच्या ढगांच्या अचूक माहितीसाठी (4 ते 8 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), हवेतल्या बाष्प, बर्फ कण तसेच पाण्याच्या थेंबांच्या आकार व प्रकार अचूक तसेच ढगफुटींची माहिती (8 ते 12 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी), ढग तयार होण्यासारखी परिस्थिती आहे का, बनलेला ढग गडद होईल की विखरून जाईल, वारे किती उंचीवर कसे वाहतात हे 8 ते 12 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सीवर कळते. ढगातील एकूण बर्फ कण, पाणी आणि गारांच्या निर्मितीचा वेग व त्यावरून त्या किती नुकसान करू शकतात याची अगदी प्रत्येक सेंटीमीटरच्या भागातली 100 टक्के (12 ते 18 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी) अचूक माहिती मिळते. हवेतील बाष्पाचे प्रमाण मोजण्यास 18 ते 24 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सीचा वापर केला जातो.

या वर्षी मुंबईसह पालघर, बदलापूर-वांगणी आदी ठिकाणी अक्षरशः ढगफुटी झाली. बदलापूर स्थानकाजवळ महालक्ष्मी एक्स्प्रेस अनेक तास अडकली. मुंबईत महापूर येऊन लोकलसेवा बंद पडेपर्यंत नेमका किती पाऊस किती वेळात होईल याची सूचना कुलाबा येथील 2.755 गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सीवर चालणारे कोटय़वधीच्या किमतीचे ‘एस बॅण्ड डॉप्लर रडार’ वेळेवर देऊ शकले नाही.

2005 मध्ये मुंबईवर आलेली जलप्रलयाची स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून राज्य सरकारने नेमलेल्या समितीने उपनगरात आणखी एक डॉप्लर रडार बसवण्याची शिफारस अहवालात केली होती, मात्र त्याची अंमलबजावणी न केल्याने 2015 मध्येही पावसाने मुंबईला वेठीस धरले. मुंबई उपनगरात दुसरे डॉप्लर रडार बसवण्यासाठी निश्चित केलेली जागा म्हणजेच महाकालीजवळील वेरावली येथील भूखंड 2017 मार्च अखेर हिंदुस्थानी हवामान विभागाला (आयएमडी) हस्तांतरित करण्यात येणार होती. आता या जागेचा ताबा आयएमडीला मिळाला आहे. मात्र हे दुसरे डॉप्लर वेदर रडार लालफितीच्या कारभारातच अडकले आहे त्यामुळे ते केव्हा कार्यान्वित होईल याचा ‘अंदाज’ घेणे कठीण आहे.

पुणे येथील हिंदुस्थाना उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्था अर्थात आयआयटीएम ढगांचा पाठलाग करण्यासाठी घेतलेली कोटय़वधींची मोबाईल डॉप्लर रडार यंत्रणा हीसुद्धा धूळ खात आहे. 2014 मध्ये महिनाभर महाराष्ट्रातील 29 जिह्यांत गारपिटीने शेतकरी बेजार होत असताना पुण्याच्या हवामान संशोधन केंद्राने म्हणजेच ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मिटीओरॉलॉजी’ने (आयआयटीएम) आपली रडार यंत्रणा बंद ठेवून ‘कार्यक्षमते’चा दर्जा दाखून दिला होता. यंदा मुंबईतील ढगफुटीच्या वेळीदेखील ही यंत्रणा बंद होती. यावेळीदेखील मुंबई व पुण्याचे डॉप्लर रडार बंद होते नाहीतर तेदेखील मुंबईला ऍलर्ट देण्यास उपयोगी ठरले असते.

केवळ विद्युत प्रवाह डॉप्लर यंत्रणेला सुरू ठेवणे म्हणजे यंत्रणा सुरू आहे असे नव्हे. आपल्याकडील रडार यंत्रणा ही कॅलिबरेटेड नाहीत. मुंबईत यंदा ढगफुटी झाली त्यावेळी डॉप्लर रडार यंत्रणा बंद होती. यावेळीदेखील मुंबई व पुण्याचे डॉप्लर रडार बंद होते नाहीतर तेदेखील मुंबईला ऍलर्ट देण्यास उपयोगी ठरले असते. विशाखापट्टणम, कोलकाता आदी ठिकाणी रडार सेट नसल्याने तेथे डोक्यावरील ढगदेखील रडारावर 8 ते 10 किलोमीटर दूर दिसतात. त्यामुळे या सर्व रडारमधील झेड (परावर्तन निर्देशांक) – आर (पाऊस) पॅरामीटर स्थानिक हवामान अनुसार कॅलिबरेट करावे लागतील. तसेच सर्व रडार आपल्याला कार्यान्वित करावे लागतील.

डॉप्लर रडार ही पावसाची खात्रीशीर माहिती देणारी आपत्कालीन यंत्रणा आहे. अचूक हवामान माहिती देण्यासाठी तिचा वापर जगभर सर्रासपणे केला जातो. दर तासाला पडणाऱया पावसाचे पद्धतशीर वर्गीकरण केल्यास कोणत्या तासाला किंवा तासाच्या भागात किती मिलीमीटर पाऊस झाला किंवा होऊ शकतो हे डॉप्लर रडार यंत्रणा वापरून निश्चित करता येऊ शकते. डॉप्लर रडारच्या सहाय्याने पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची माहिती सहा ते चार तास आधी मिळू शकते. मात्र मुंबईत झालेल्या पावसात ही यंत्रणा निष्क्रीय ठरली.

(लेखक हवामान शास्त्रज्ञ आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या