अतिरिक्त शिक्षकांना ‘डबलड्युटी’! शाळेत अभ्यासही घ्या; निवडणुकीची कामेदेखील करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

अतिरिक्त ठरलेल्या तसेच शाळांमधील रिक्त जागांवर नेमणूक झालेल्या शिक्षकांना निवडणूक आयोगाने ‘डबलडय़ुटी’ लावली आहे. निवडणुकीची कामे करण्यास ‘बीएलओं’चा (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) तुटवडा असल्याने शाळांमध्ये नव्याने नेमणूक झालेल्या अतिरिक्त शिक्षकांना शाळेसोबतच उर्वरित वेळेत निवडणुकीची कामे करण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकाऱयांनी दिले आहेत.

नोव्हेंबर महिन्यात अतिरिक्त शिक्षकांची ऑनलाइन समायोजनांतर्गत शाळांमध्ये नव्याने नेमणूक झाली आहे, ही नेमणूक होण्यापूर्वी हे शिक्षक 2019 ला होणाऱया लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत व शुद्धीकरणाचे काम करीत होते पण आता या शिक्षकांची शाळांमध्ये वर्णी लागल्याने त्यांना या कामातून वगळण्यात येणे अपेक्षित होते. मात्र बीएलओची कमतरता असल्याचे कारण पुढे करीत या शिक्षकांना अध्यापनाच्या कामाबरोबरच उर्वरित वेळेत निवडणुकीचे काम पाहण्याच्या सूचना निवडणूक अधिकाऱयांनी शिक्षण निरीक्षकांमार्फत दिल्या आहेत.

हे तर विद्यार्थ्यांचे नुकसान
अतिरिक्त शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीला आधीच उशीर झाला आहे. ज्या शाळांमध्ये आता शिक्षक उपलब्ध झाले आहेत, त्या शिक्षकांना दहावी, बारावी परीक्षांच्या तोंडावर निवडणुकीच्या कामांना जुंपणे चुकीचे आहे अशी टीका मुंबई मुख्याध्यापक महामंडळान केली आहे. महामंडळाच्या वतीने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेश बोरकर यांना निवेदन दिले असून परीक्षांच्या तोंडावर शिक्षकांना निवडणुकीची कामे लावू नयेत, अशी मागणी केली आहे. महामंडळाच्या वतीने अध्यक्ष शंकर पवार, सचिव प्रशांत रेडीज, तुकाराम सवादेकर, जयसिंग कदम, राजन महाडेश्वर यांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.

शिक्षकांना ही कामे करावी लागतात
मतदारयादीतील त्रुटी व दोष दूर करणे.
मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण.
मतदान केंद्राच्या इमारतीची भौतिक पडताळणी
मतदान केंद्रे निश्चित करणे.
अंतिम मतदारयादीतील दुरुस्ती.
मुंबई उपनगरांतील मतदान केंद्रे 7 हजार 223 इतकी होती. त्यामध्ये यंदा 74 नव्या केंद्रांची भर पडली आहे.
निवडणूक आयोगाने एका यादी भागास एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नेमण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार उपनगरात बीएलओंची संख्या अपुरी असल्यामुळे बिगर अल्पसंख्याक व अल्पसंख्याक शाळांतील ज्या अतिरिक्त शिक्षकांची इतर शाळांत नव्याने नेमणूक झाली आहे अशा शिक्षकांनी निवडणुकीची कामे करायची आहेत.