
घराची कागदपत्रे बँकेत तारण ठेवून 31 लाखांचे कर्ज घेऊन बँकेची फसवणूक करणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. प्रणवेष मळेकर असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यात त्याला काही दिवसांपूर्वी गावदेवी पोलिसांनी अटक केली होती.
प्रणवेष हा जोगेश्वरी येथे राहत असून त्याने काही महिन्यांपूर्वी अंधेरी येथील एका खासगी बँकेत कर्जासाठी घराची कागदपत्रे सादर केली होती. घराची कागदपत्रे तारण ठेवून त्याने 31 लाखांचे कर्ज घेतले होते. एकाच रूमवर प्रणवेषने आणि एका बँकेकडे कागदपत्रे तारण ठेवून कर्ज घेतल्याचे अंधेरी येथील एका बँकेच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बँकेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी प्रणवेषविरोधात गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांना प्रणवेषची माहिती मिळाली. तो जोगेश्वरी येथे राहत असल्याची माहिती समजताच पोलिसांचे पथक जोगेश्वरी येथे गेले होते, मात्र तो तेथे मिळून आला नाही. त्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात दोन महिन्यांपूर्वी गावदेवी पोलिसांनी अटक केली होती. फसवणुकीच्या गुन्ह्यात तो सध्या तुरुंगात होता. त्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.


























































