
‘संपूर्ण संस्कृती एका रात्री संपवू,’ अशी धमकी दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामासाठी सहमती दर्शवली आहे. ‘हा एक दुहेरी युद्धविराम असेल’, असे म्हणत इराणमधील वीज प्रकल्प आणि पुलांवर बॉम्ब हल्ले करण्याच्या इशाऱ्यापासून त्यांनी पाऊल मागे घेतले आहे. यात त्यांनी पोस्ट केलेल्या अगदी पहिल्याच वाक्यात पाकिस्तानच्या मध्यस्तीचा उल्लेख केला असून त्यांच्याकडून मांडलेला प्रस्ताव स्वीकारला असल्याचे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर या युद्धविरामाची घोषणा करताना सांगितले की, त्यांनी पाकिस्तानने मांडलेला प्रस्ताव स्वीकारला आहे. या प्रस्तावानुसार दोन आठवडे हल्ले थांबवण्याचे आणि ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) तात्काळ खुली करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रम्प म्हणाले की, अमेरिका या दोन आठवड्यांच्या कालावधीचा वापर इराणसोबतच्या अंतिम करारासाठी करेल.
आपल्या पोस्ट मध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की ‘हे करण्याचे कारण म्हणजे आम्ही आमची सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच पूर्ण केली आहेत. इराणसोबत दीर्घकालीन शांतता आणि मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या अंतिम कराराच्या दिशेने आम्ही खूप पुढे गेलो आहोत’.
ट्रम्प यांनी पोस्ट केले आहे की, ‘पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेच्या आधारे, आणि ज्यामध्ये त्यांनी मला आज रात्री इराणच्या दिशेने पाठवण्यात येणारे विध्वंसक बळ रोखण्याची विनंती केली होती, त्यानुसार तसेच इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे, त्वरित आणि सुरक्षितपणे उघडण्यास संमती देण्याच्या अटीवर, मी इराणवरील बॉम्ब हल्ले दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी स्थगित करण्यास सहमत आहे. हा एक दुहेरी युद्धविराम (double sided ceasefire) असेल! याचे कारण असे की आम्ही आमची सर्व लष्करी उद्दिष्टे आधीच पूर्ण केली असून ती ओलांडली आहेत आणि इराणसह मध्यपूर्वेत दीर्घकालीन शांततेसाठीच्या अंतिम कराराच्या दिशेने आम्ही खूप पुढे गेलो आहोत. आम्हाला इराणकडून १० कलमी प्रस्ताव प्राप्त झाला असून तो वाटाघाटीसाठी एक व्यवहार्य आधार आहे असे आम्हाला वाटते. अमेरिका आणि इराणमधील वादाचे जवळपास सर्व मुद्दे मान्य झाले आहेत, परंतु दोन आठवड्यांचा हा कालावधी करार पूर्ण करण्यास आणि त्याची अंमलबजावणी करण्यास मदत करेल. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून आणि मध्यपूर्वेतील देशांचे प्रतिनिधित्व करताना, ही दीर्घकालीन समस्या सुटण्याच्या मार्गावर असणे ही एक प्रकारे सन्मानीय बाब आहे. या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!’
🚨 President Donald J. Trump makes a statement on Iran: pic.twitter.com/9mqTayL0Q3
— The White House (@WhiteHouse) April 7, 2026
इराणचाही सकारात्मक प्रतिसाद
इराणनेही याला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे संकेत दिले आहेत. देशाच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या वतीने परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले,
‘जर इराणवरील हल्ले थांबले, तर आमचे सामर्थ्यशाली सशस्त्र दल त्यांच्या संरक्षणात्मक मोहिमा थांबवेल.’
ते पुढे म्हणाले की, दोन आठवड्यांसाठी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास ‘इराणच्या सशस्त्र दलांशी समन्वय साधून आणि तांत्रिक मर्यादांचा योग्य विचार करून’ शक्य होईल.

























































