शालेय निकालाचे मूल्यमापन आणि गुणवत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अनिल कुलकर्णी

मूल्यमापन म्हणजे केवळ कचरा भरायचे सूप असू नये. कचरा पुढे ढकलणे म्हणजे स्वच्छता नाही हेही लक्षात ठेवावे लागेल. मुलांची भावनिक दरड कोसळली आहे, ना मित्र-नातेवाईक, ना शिक्षक, कुणातच त्यांना मिसळता येत नाही. प्रतिज्ञा नाही, प्रार्थना नाही, परिपाठ नाही, तोंड उघडण्याची संधी नाही. त्यामुळे एक प्रचंड भावनिक पोकळी भरून काढण्यासाठी नव्याने शिक्षणाचा विचार करावा लागेल. फसवे यश साजरा करणारा समाज कधीच अपेक्षित उंची गाठू शकत नाही.

बाजारात चलन फुगवटा व विद्येच्या माहेरघरात गुणांचा फुगवटा झाला आहे. गुणवत्ता की मृगजळ, हा प्रश्न सध्या शिक्षण क्षेत्रात पडला आहे. निकाल शैक्षणिक अवस्थेचा व व्यवस्थेचा लागला आहे. बोर्डालाच परीक्षेचा निकाल लावावा लागतो. यापूर्वी तीन वर्षांच्या मूल्यमापनावर आधारित त्यांनी निकाल लावला होता. मागील वर्षी भाऊच्या धक्क्यामुळे परीक्षेचा घाट घातला गेला. 75 टक्के अभ्यासक्रम, अर्धा तास जास्तीचा वेळ व आपली शाळा आपलेच शिक्षक या वातावरणामुळे लागलेला अभुतपूर्व निकाल विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या दृष्टीने व शासनाच्याही दृष्टीने सुखावह आहे. 96.94 टक्के निकाल विक्रमी आहे. 1.64 टक्के वाढ आहे. हे भूषणावह आहे का दुषणावह आहे, हे काळच ठरवेल.

दहावीचा निकाल जरी शंभरीकडे जाणारा असला तरी दहावीची परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांची राज्यातील राष्ट्रीय सर्वेक्षणातील गणित, विज्ञान, भाषा, सामाजिक शास्त्र या विषयातील कामगिरी 50 टक्केही नाही. इंग्रजी वगळता बाकी चारही विषयांत तीस टक्क्यांपेक्षा अनेक विद्यार्थ्यांना विज्ञान, सामाजिक शास्त्रातील प्राथमिक संकल्पना स्पष्ट झालेल्या नव्हत्या, मात्र 96.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा विरोधाभास याचे स्पष्टीकरण काय? राष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये राज्यातील विद्यार्थ्यांची गणितातील सरासरी गुण 29 आहे तर ते 33 टक्के विद्यार्थ्यांना संकल्पनाही स्पष्ट झाल्या नव्हत्या. राज्य मंडळाच्या परीक्षेत गणितातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 97.3 टक्के आहे. विज्ञानाची राष्ट्रीय सर्वेक्षणातील सरासरी 34 होती. 77 टक्के विद्यार्थ्यांच्या प्राथमिक संकल्पना स्पष्ट झाल्या नसल्याचे समोर आले होते. राज्य मंडळाच्या परीक्षेत विज्ञान विषयाचा निकाल 98.1 टक्के लागला आहे. हे बरोबर आहे का?
विद्यार्थी पाठांतर करतात ते गुण मिळवण्यासाठी, संकल्पना स्पष्ट होण्यासाठी नव्हे. विद्यार्थी तेच अभ्यासक्रमाचा मूलभूत आराखडाही तोच, तरी समान मूल्यें का झिरपत नाहीत?
निकाल लावण्यापेक्षा निकाल तपासणे जास्त महत्त्वाचे झाले आहे. पहिल्या मूल्यमापनाच्या आधारावरच व सरासरीवर नवीन मूल्यांकनावर शिक्कामोर्तब केले गेले. अंतर्गत गुणांची बरसात करून सगळय़ांनाच खूश केले. अंतर्गत गुण व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करण्यासाठी आहेत, पास करण्यासाठी नाहीत. दोषी कोणाला धरायचे हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. पूर्वीचे निकाल गृहित धरले गेले, पण ते गुण कसे दिले हे तपासणारी यंत्रणा सक्षम नसल्यामुळे निकालाला बाळसें नाही तर सुज झाली.

जिथे काहीच घडले नाही तिथेही गुणांचे रकाने कसें भरले गेले? त्या शाळांचा विचार करावा लागेल जिथे मुले शाळेत आलीच नव्हती. काही शाळांमध्ये पूर्वीचे हजेरी रजिस्टर आजही तपासले तरी उपस्थित असल्याचे दाखवलेले असते. अनेक ठिकाणी नववीत मुले कशी पास केली जातात हे तपासायला हवे. ज्ञान, मूल्य, कौशल्य यापासून तर अनेक मुले खूप दूर आहेत. आजच्या माहितीच्या युगात फक्त माहितीच मिळत आहे.

आतापर्यंत कागदावरचे मूल्यमापनच देशाला तारत आले आहे. परीक्षेतल्या कॉपीवर तरी कुठे नियंत्रण होते?

परीक्षा झाली नाही म्हणून आजही काही मुले रडली की आपले मूल्यमापन नीट होणार नाही. परीक्षा झाली असती तर अजून जास्त चांगले गुण मिळवता आले असते, असाही एक प्रामाणिक वर्ग आज आहे. नापास झाल्यावर रिचेकिंग करता येते, पण पास झाल्यावर रिचेकिंग करता येईल का? माझ्या पाल्याला इतके गुण मिळाले कसे? हे विचारणारे पालक जोपर्यंत नसणार तोपर्यंत हे असेच असणार. पूर्वी शाळा तपासणीमुळे वचक असायचा. त्यामुळे शाळा थोडाफार तरी ट्रकवर चालायची, पण आता तपासणी करणारी यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यामुळे विश्वास नसलेल्या यंत्रणेवरच विश्वास टाकावा लागत आहे व सगळेच याच्यात सुरक्षित आहेत.

माहिती मागितली म्हणून ती आम्ही पाठवली व आम्हाला माहिती जशी मिळाली तशी आम्ही गृहित धरली व आम्ही त्या आधारावर निकाल लावला, असे चालू आहे. मुले पास केली जातात व करावी लागतात हे आजचे वास्तव आहे. शिक्षकांच्या पुढय़ात मुलेच नाहीत, त्यांचे मूल्यमापन शिक्षकांना करायचे आहे.

दोष कुणाला द्यायचा हाच प्रश्न आहे. सगळय़ांच्याच आज अस्तित्वाचा प्रश्न असल्यामुळे एकमेकावर विश्वास ठेवणे अपरिहार्य आहे. पूर्वी शाळा आहे शिक्षण नाही अशी परिस्थिती होती, आता शाळाही नाही व शिक्षणही नाही अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. मूल्यशिक्षण तर गुंडाळून ठेवल्यातच जमा आहे. फक्त पह्टोजिनिक मूल्ये उरली आहेत. पूर्वी पालक गृहपाठ करायचे, आता प्रकल्पही करतात. फसवे पह्टो पाठवा आणि फसवे यश पदरात पाडून घ्या. नावापुरती कृती करून मुले कौशल्याचे ठेकेदार बनत आहेत.
आतापर्यंत अध्ययन, अध्यापन पद्धतीने विद्यार्थी घडत, आता ऑनलाइन अध्यापनाचे मूल्यमापन जर करायचे असेल तर मूल्यमापनाच्या संदर्भात वेगळा विचार करणे आवश्यक आहे.
अनेक तज्ञ नुसती टीका करत आहेत. त्यांनी नियोजनात गुंतवून घ्यावे. मूल्यमापन पद्धती विकसित करण्यासाठी ब्लू प्रिंट द्यावी.

खालील काही गोष्टी करता येतील

ऑनलाइन शिक्षणाचे अध्यापन व त्यातील त्रुटी शोधून मार्गदर्शक तत्त्वें बनवावीत.
अभ्यासक्रमाचे नियोजन करून घटकांची विभागणी करावी स्वयंअध्ययन, होम स्कूलिंग शिकवायचे घटक याचे नियोजन शाळांनी शालेय पातळीवर करावे.
शिक्षकांना आता टाचण वही काढावी लागत नाही, त्याऐवजी हे नियोजन करू शकतात.
शाळा भरत नसलेल्या परिस्थितीमध्ये अध्यापन व मूल्यमापनासाठी एक शिक्षण तज्ञांची समिती नेमून त्यांनी तीन महिन्यांत अहवाल द्यावा व त्याची अंमलबजावणीही करावी.
अनेक ठिकाणी अनेक शिक्षकांनी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून ऑनलाइन शिक्षण यशस्वी केले ते सार्वत्रिक व्हावेत. नांदूरच्या रोहिणी लोखंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी मोबाईलद्वारे सायंकाळी 7 ते 9.30 यादरम्यान एका स्वयंसेविकेच्या सहाय्याने अंगणात शिक्षण दिले. व्हॉट्सअॅपवर गृहपाठ तपासले. अशा व इतर अनेक शिक्षकांच्या नावीन्यपूर्ण कल्पना आहेत. पुण्याच्या मानव्य संस्थेकडून त्यांनी मोबाईल मिळवले, हे प्रातिनिधिक उदाहरण आहे.
विद्यार्थ्यांना आधी पाठ वाचून व तयारी करण्यास सांगावे व ऑनलाइन शिक्षणाच्या वेळेस फक्त शंकासमाधान करावे.
अनेक शिक्षक आपापल्या पातळीवर ऑनलाइन शिक्षणात भेडसावणाऱया प्रश्नावर उकल शोधताहेत. चांगल्या योजना, प्रकल्प राज्य पातळीवर राबवण्यात याव्यात.
परीक्षक मॉडरेटर जसे पूर्वी होते तसे आता हे जे अंतर्गत गुण दिले आहेत ते मॉडरेटरकडून तपासण्यात यावेत. याचे नियोजन शालेय पातळीवर व्हावे.
मूल्यमापन म्हणजे केवळ कचरा भरायचे सूप असू नये. कचरा पुढे ढकलणे म्हणजे स्वच्छता नाही हेही लक्षात ठेवावे लागेल. मुलांची भावनिक दरड कोसळली आहे, ना मित्र नातेवाईक, ना शिक्षक, कुणातच त्यांना मिसळता येत नाही. प्रतिज्ञा नाही, प्रार्थना नाही, परिपाठ नाही, तोंड उघडण्याची संधी नाही. त्यामुळे एक प्रचंड भावनिक पोकळी भरून काढण्यासाठी नव्याने शिक्षणाचा विचार करावा लागेल. फसवे यश साजरा करणारा समाज कधीच अपेक्षित उंची गाठू शकत नाही. ज्यांच्याकडून डागडुजींची अपेक्षा आहे ते स्वतःचे अस्तित्व टिकवण्यात मश्गूल आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला आम्हालाच शिक्षणाचा कोसळणारा डोलारा सांभाळावा लागेल.

[email protected]