
डोळ्यांतून घळघळणारे अश्रू, मनामनात दाटलेल्या आठवणी आणि हुंदके… अशा वेदनादायी अंतःकरणाने कष्टकऱ्यांचे नेते उपेक्षितांचे तारणहार ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना शेकडो हातांनी अखेरचा दंडवत घालत निरोप दिला. ‘बाबा आढाव अमर रहे’च्या घोषणांतच कष्टकऱ्यांचे लाडके बाबा अनंतात विलीन झाले.
पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. कोणतेही विधी न करता विद्युतदाहिनीत त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. बाबांच्या पत्नी शीला, मुलगा असीम आणि अंबर यांचे पवार यांनी सांत्वन केले. यावेळी माजी गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख, चेतन तुपे, पोलीस उपायुक्त कृषिकेष रावल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील मान्यवरांससह ज्यांच्या प्रश्नासाठी, न्याय हक्कांसाठी डॉ. बाबा आढाव यांनी आयुष्यभर लढा दिला, असे असंघटित कामगार, हमाल, रिक्षा चालक, कचरा वेचक व अन्य कष्टकरी वर्गाने अंत्यदर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.


























































