पादचाऱयांच्या हातातले मोबाईल हिसकावून पळायचा; डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांनी केली चोराला अटक

पादचाऱयांच्या हातातले महागडे मोबाईल हिसकावून दुचाकीने सुसाट फरार होणारा चोरटा डॉ. डी. बी. मार्ग पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी त्याला पकडून दोन गुह्यांची उकल करत चोरीचे दोन मोबाईल आणि गुह्यात वापरणारी दुचाकी हस्तगत केली आहे.

रामलखन निशाद (27) हा तरुण मफतलाल बाथसमोरील परिसरातून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या चोराने त्याच्या हातातला महागडा मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी निशाद याने तक्रार दिल्यानंतर डी. बी. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक विनय घोरपडे, निरीक्षक विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. शोधाशोध सुरू असताना मोबाईल चोरीचा आरोपी वरळी नाका येथे असल्याचे कळताच उपनिरीक्षक नितीन झाडे व पथकाने सापळा लावून एका संशयिताला पकडले. मयूर वाघेला (34)असे त्याचे नाव असून तो चालकाचे काम करतो. ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुह्याची कबुली दिली. त्याचबरोबर एम. आर. ए. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतदेखील एक मोबाईल चोरीचा गुन्हा केल्याचे त्याने सांगितले. मयूरकडून दोन महागडे मोबाईल व एक दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली आहे