डॉ. दाभोलकर यांची हत्या नेमक्या कोणत्या पिस्तुलाने?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

अंधश्रद्धानिर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेल्या कळसकरने मुंबईतील खाडीमध्ये फेकलेल्या पिस्तुलातून डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची शक्यता सीबीआयने न्यायालयात व्यक्त केली होती.

डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी एटीएसने मनीष नागोरी आणि खंडेलवाल यांच्याकडून पिस्तूल जप्त केले होते. ते पिस्तूल डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये वापरल्याचे त्यावेळी एटीएसचे म्हणणे होते. त्यानंतर 2015 साली गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमध्ये एकाच पिस्तुलाचा वापर केला गेल्याची थिअरी तपास यंत्रणेने मांडली. मात्र, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर काही दिवसांच्या आतच पिस्तूल जप्त करण्यात आले होते. मग, पोलिसांच्या ताब्यात असताना त्याच पिस्तुलाचा वापर पानसरे यांच्या हत्येमध्ये कसा केला जाऊ शकतो? असा सवाल निर्माण झाला आहे.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करणाऱया मारेकऱ्यांनी गुह्यातील पिस्तूल हे डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी अटक केलेल्या सचिन अंदुरे याच्याकडे ठेवण्यासाठी दिले असल्याचा दावा सीबीआयमार्फत करण्यात आला होता. अंदुरे याच्या मेहुण्याच्या मित्राकडून जप्त केलेले पिस्तूल तेच असल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला होता. दरम्यान, हे पिस्तूल तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आले. तपासणीनंतर या पिस्तुलाचा वापर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमध्ये केला गेल्याचे सांगण्यात आले. नालासोपारा स्फोटकप्रकरणी अटक करण्यात आलेला शरद कळसकर हादेखील डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमधील दुसरा शूटर असल्याचे सांगून सीबीआयने त्याला डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये नवीन मुद्दा न्यायालयात मांडण्यात आला. कळसकर याच्याकडे चार पिस्तुले होती. ती तोडून त्याने मुंबईतील एका खाडीमध्ये फेकून दिली. मात्र, रात्री ही पिस्तुले खाडीत फेकल्यामुळे नेमकी जागा कळसकरला आठवत नसल्याचा दावा तपास यंत्रणेमार्फत न्यायालयात करण्यात आला. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या वेळी नेमक्या कोणत्या पिस्तुलाचा वापर केला गेला? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

कळसकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी

अंधश्रद्धानिर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या शरद कळसकर याची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एम. ए. सय्यद यांनी 29 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.