डॉ. कमलाकर देसाई यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवणच्या वैद्यकीय क्षेत्रात जवळपास ५० वर्षांहून अधिक काळ सर्वसामान्यांचे डॉक्टर अशी जनमानसात प्रतिमा निर्माण करणारे डॉ. कमलाकर नरसिंह देसाई यांचे शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मालवण येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते. प्रसिद्धीपासुन दूर असलेल्या डॉ. क. न. देसाई हे दानशुर म्हणुनही ओळखले जात होते. त्यांच्या निधनाबद्दल मालवणात शोक व्यक्त केला जात आहे.

मुळ वालावल (कुडाळ) गावचे रहिवासी असणारे कमलाकर देसाई यांचे पुर्वज व्यवसायाच्या निमित्ताने मालवणात आले. मालवण धुरीवाडा येथे डॉ. देसाई हे आपल्या पत्नीसंवेत राहत होते. मुंबईच्या के एम हॉस्पिटलमधून एमबीबीएसची पदवी संपादन केल्यावर त्यांनी मालवण पोस्ट ऑफिस जवळ त्यांनी सत्तरच्या दशकात दवाखाना थाटला. मृदू स्वभाव आणि अचूक निदान यामुळे अल्पावधीतच डॉ. देसाई हे जनमानसात लोकप्रिय ठरले. सर्वसामान्य माणसाचे कैवारी म्हणुन ओळख असलेल्या डॉ. देसाई यांचे राष्ट्र सेवादल मालवणचे अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कुल, कन्याशाळा यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. त्यांना संगीत क्षेत्राची आवड होती. परोपकारी स्वभावाच्या डॉ. देसाई यांनी कोणताही गाजावाजा न करता अनेक संस्थांना अनामिक स्वरुपात लाखो रुपयांची देणगी दिली होती. जुन्या काळातील डॉक्टर अशी ख्याती मिळविलेल्या डॉ. देसाई यांनी प्रारंभीच्या काळात नेत्रतज्ञ म्हणूनही काम केले. डॉ. देसाई यांचे सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. पु. ल. देशपांडे यांच्याशी घरोब्याचे संबंध होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे २००९ च्या दरम्यान डॉ. देसाई यांनी वैद्यकीय सेवा करणे शक्य नसल्याने वैद्यकीय सेवा बंद करुन स्वतःची वैद्यकीय पदवी मेडिकल कौन्सिलकडे परत करणारे ते जिल्ह्यातील बहुदा पहिले डॉक्टर होत. डॉ. देसाई हे मालवणात पत्नीच्या निधनानंतर एकटेच राहत होते. पुण्याच्या प्रसिद्ध किशोर पंपचे मालक किशोर देसाई यांचे ते थोरले बंधु होत. डॉ. देसाई यांच्या पार्थिवावर शनिवार ९ जुन रोजी सकाळी ८ वाजता चिवला बीच येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.