शिस्त, गुणवत्तेत तडजोड नाही; नूतन कुलगुरू डॉ. प्रमोद येवलेंचा पहिलाच धडा

87

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

‘महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालणाऱ्या संभाजीनगर येथील विद्यापीठात कार्य करण्याची संधी आपणास मिळाली आहे. आपण शिस्त आणि गुणवत्तेच्या बाबतीत कसल्याही प्रकारची तडजोड करणार नाही’, असा पहिलाच धडा नूतन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी आज मंगळवारी स्वीकारला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दीक्षाभूमीतून ‘शिक्षाभूमीत काम करण्याची संधी आपल्याला राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांनी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून ते पुढे म्हणाले, विद्यापीठासमोर अनेक आव्हाने आहेत, विद्यापीठासमोर ग्लोबल स्पर्धा आहे, या स्पर्धेत आपला विद्यार्थी कसा टिकाव धरेल, आव्हान कसे पेलेल याचा सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. विद्यापीठ एकट्या कुलगुरूंचे नाही, गुणवत्ता देणे हे प्रत्येक घटकाचे काम आहे. यासाठी प्रत्येकांने आपली जबाबदारी ओळखून काम करण्याची गरज आहे, यात शिस्तही तितकीच महत्त्वाची आहे.

संशोधन सामाजिक आणि विभागाची गरज लक्षात घेऊन झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत डॉ. येवले पुढे म्हणाले, नागपूर विद्यापीठात केलेल्या कामाचा उल्लेख करून येथे आठ दिवस अभ्यास करून एक रोड मॅप तयार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. विविध संघटनांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित झाला असता कुलगुरू म्हणाले, लोकशाहीने दिलेला तो एक अधिकार आहे, त्याला संपुष्टात आणणे शक्य नाही. मात्र, या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींनी सकारात्मक कार्य केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यापीठातील रिक्त पदांसदर्भात पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता मनुष्यबळ असेल तरच रिझल्ट देता येईल, आवश्यक ती पदे लवकर भरली जातील, अशीही ग्वाही त्यांनी दिली.

प्रारंभी प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी डॉ. येवले यांचे स्वागत करून कुलगुरूपदाचा पदभार सोपविला. त्यानंतर महात्मा फुले सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी डॉ. शिंदे यांचे स्वागतपर भाषण झाले. कुलगुरू डॉ. येवले यांनी आपली भूमिका स्पष्ट करत चांगले काम करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक प्रा. मुस्तजीब खान यांनी केले. शेवटी प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या