कातळात कोरलेला – लहुगड

>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक

लहुगडावर कातळात कोरलेले रामेश्वर महादेवाचे मंदिर आहे. एवढे देखणे मंदिर आजमितीस दुर्लक्षित असल्याची खंत वाटते.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा अजिंठा, वेरूळसारख्या कातळकोरीव लेण्यांमुळे प्रसिद्ध आहे. या लेण्यांप्रमाणेच येथील काही किल्लेही कातळ कोरूनच तयार केले आहेत. या कातळ कोरून तयार केलेल्या किल्ल्यांमध्ये प्रामुख्याने नाव येते ते किल्ले देवगिरीचे. या ऐतिहासिक देवगिरीच्या घेऱयात लहुगड, भांगशीसारखे अजून दोन छोटेखानी किल्ले आहेत की, जे केवळ कातळ कोरूनच तयार केले आहेत. यातील लहुगड हा भांगशी गडापेक्षा अवशेषांच्या दृष्टीने सरस आहे.

लहुगडास भेट देण्यासाठी आपणास छत्रपती संभाजीनगर- सिल्लोड रस्त्यावरील फुलंब्री गावच्या पुढे असलेला पालफाटा गाठावा लागतो. येथून पुढे जातेगाव-नांद्रा असा प्रवास करत आपण लहुगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचतो. पायथ्याशी असलेल्या मारूती मंदिरासमोर गडावर जाण्यासाठी पायऱयांचा मार्ग आहे. या मार्गाने वर गेल्यावर डाव्या हाताला दासानंद स्वामी सरस्वती नावाच्या साधूंची समाधी आहे. हे साधू पूर्वी गडावरील मठाचे काम पाहत असत. येथून पुढे एक वाट गडमाथ्यावर जाते तर दुसरी वाट पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रामेश्वर मंदिराकडे जाते.

लहुगडाचे मुख्य आकर्षण असलेले रामेश्वराचे हे मंदिर पूर्णतः डोंगर तासूनच तयार केलेले आहे. मंदिराच्या समोर असलेल्या घुमटीतील गणेशाचे शिल्प या मंदिराची शोभा कैकपटीने वाढवते. मंदिरात प्रवेश करताच मंदिराच्या स्तंभावरील कोरीवकाम, छतावरील दगडी कमळ, गर्भगृहातील शिवलिंग पाहून आपण थक्क होऊन जातो. हे मंदिर पाहताना आपल्या पूर्वजांनी दगडातसुद्धा कसा जीव ओतलाय याचा प्रत्यय येत राहतो. हे देखणे मंदिर पाहून आपण गडमाथ्याकडे प्रस्थान करायचे.

गडमाथ्यावर जाण्यासाठी असलेला कातळकोरीव पायऱयांचा टप्पा पार करून आपण अखंड कातळात कोरलेल्या बोगद्यावजा प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो. प्रवेशद्वाराच्या वरच्या अंगाला डाव्या बाजूकडील कातळात दुर्गविशारदाने एक गुहा कोरून काढलेली आहे. या गुहावजा देवडीचा वापर पहारेकरी विश्रांती घेण्यासाठी करायचे. गडमाथ्यावर पोहोचताच जमिनीवर आपणास चाळणीसारखी, एकमेकांशी आतून जोडलेली पाण्याची दहा-बारा टाकी दिसतात. पुढे उजव्या हाताला जाणाऱया वाटेवर एक प्रशस्त, पण आजमितीस कोरडे असलेले खांब टाकी लागते. या खांब टाक्याच्या जवळ पिण्याच्या पाण्याची दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या पुढे गेल्यावर ‘सितान्हाणी’ नावाचे ठिकाण लागते. पौराणिक आख्यायिकेनुसार राम, लक्ष्मण, सीता वनवासात असताना लहुगडावर वास्तव्यास आले होते. सितान्हाणी या ठिकाणी एका आयताकृती टाक्यात मध्यभागी समाधीसारखा चौथरा आहे, तर आतील भागात पाण्याची विस्तीर्ण खांब टाकी दिसून येतात. ही वास्तू पाहून पायऱयांनी खाली उतरून आपण दक्षिणेकडील गडाच्या पोटात असलेल्या कातळकोरीव गुहेजवळ येऊन पोहोचतो. ही गुहा पाहून झाली की आपली गडफेरी पूर्ण होते.

दुर्लक्षित रामेश्वर मंदिर
या गडावरील सर्व कातळकोरीव अवशेष व रामेश्वर महादेवाचे मंदिर पाहता या गडाची निर्मितीसुद्धा अजिंठा-वेरूळ व देवगिरीसारख्या अप्रतिम कलाकृती साकारणाऱया महान नृपाळांच्या हातातूनच झाली असणार हे निश्चित. प्राचीनतेशी नाळ जोडणाऱया या गडावरील रामेश्वरासारखे एवढे देखणे मंदिर आजमितीस दुर्लक्षित असल्याची खंत गडाचा निरोप घेताना मनाला वाटते. खरे तर असे सुंदर मंदिर दुर्लक्षित राहणे हे त्या मंदिराचे नाही तर आपले दुर्दैव.