सह्याद्रीच्या कुशीत लपलेला घनगड

>> डॉ. संग्राम इंदोरे, दुर्ग अभ्यासक

तळकोकणातून ताम्हिणी घाटामार्गे जेव्हा आपण घाटमाथ्याकडे येतो, तेव्हा डाव्या हाताला दूरवर अजस्र पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगररांगा, त्या डोंगररांगांमधील अक्राळविक्राळ घळी आपले लक्ष वेधून घेतात. तैलबैलाच्या दोन वैशिष्टय़पूर्ण कातळभिंतीपासून ताम्हिणी घाटादरम्यान पसरलेल्या या डोंगररांगेत एक छोटासा तटबुरुजांनी वेढलेला डोंगर काहीसा पुढे डोकावून तळकोकणावर विशेष लक्ष देत असल्यासारखा वाटतो. या परिसरातील इतर डोंगरांपेक्षा उंचीने कमी असलेल्या या डोंगरावर ‘कोरसबारस’ मावळातील एक प्राचीन किल्ला आहे. हा छोटेखानी किल्ला म्हणजे किल्ले घनगड होय.

किल्ले घनगडास लोणावळा व ताम्हिणी घाट या दोन्ही मार्गांनी भेट देऊ शकतो. लोणावळय़ावरून ऍम्बी व्हॅलीमार्गे पेठ शहापूर-भांबुर्डे असा प्रवास करून आपण गडपायथ्याच्या एकोले गावात दाखल होतो. एकोले गावात पोहोचल्यानंतर घनगडाचा आटोपशीर विस्तार आपल्या लक्षात येतो. मळलेल्या पायवाटेने आपण थोडय़ाच वेळात गर्द झाडीत असलेल्या गारजाई देवी मंदिरापाशी पोहोचतो. मंदिराच्या दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीत एक शिलालेख कोरलेला आहे. मंदिरापासून दाट झाडीतून वर चढून गेल्यावर काही वेळातच दोन बुरुजांच्या बेचक्यात असलेले गडाचे पहिले प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वारासमोर कातळात कोरलेल्या दोन गुहा आहेत, तर उजव्या बाजूस एक प्रचंड मोठा खडक प्रस्तर वरच्या कातळातून निसटून खाली आलेला आहे. हा दगड कातळाला रेलून उभा राहिल्यामुळे येथे एक नैसर्गिक कमान तयार झालेली आहे. वरच्या बाजूस कातळात कोरलेली छोटी गुहा आहे. या गुहेत वाघजाई देवीची सुंदर मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला 15 फुटांचा सरळसोट कडा आहे. या अवघड जागी  ‘शिवाजी ट्रेल’ या संस्थेने भलीमोठी लोखंडी शिडी बसवल्यामुळे आजमितीस विनासायास आपण हा कातळटप्पा पार करू शकतो.  वर गेल्यावर अनुक्रमे आपणास कातळकोरीव गुहा, पाण्याची चार टाकी, बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार, खिंडीकडे तोंड करून दिमाखात उभा असलेला चिलखती बुरूज दिसतो. हे सर्व अवशेष व्यवस्थित पाहून जेव्हा आपण गडमाथ्यावर येतो त्या वेळी गडाच्या आसमंतातले दृश्य आपल्या डोळय़ांचे पारणे फेडते. गडमाथ्यावरूनच आपणास सुधागड, सरसगड या गडकिल्ल्यांचे, तैलबैलाच्या दोन कातळभिंतींचे विलोभनीय दर्शन घडते.  कोकणात उतरणाऱया नाणदांड घाट, सवाष्णीचा घाट, भोरप्याची नाळ या घाटवाटांचे दुर्गमत्व भान हरखून टाकते.

दुर्गम जागी असल्यामुळे शहरीकरणाचा गंधही नसलेला किल्ले घनगड आपल्या मनावर वेगळीच छाप सोडतो. जेव्हा कधी आपण परत ताम्हिणी घाटमार्गे तळकोकणातून घाटमाथ्यावर येऊ तेव्हा  आपल्या मनाला हा लहानसा घनगड साद घातल्याशिवाय राहणार नाही.

 या दुर्गम किल्ल्याचा इतिहासातही फारसा उल्लेख नाही. टेहळणीसाठी व  व्यापारमार्गावर वचक ठेवण्यासाठी घनगडाचा  वापर होत होता.  पेशवेकाळात या गडाचा वापर तुरुंगासारखा होऊ लागला. पानिपतच्या युद्धानंतर बंडाळी माजवणाऱया सदाशिवभाऊंच्या तोतयास येथेच डांबून ठेवले होते.