अनवट वाटा – रिव्हर राफ्टिंग – एक रोमांचक अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • डॉ. सरिता विनय भावे

बेबंद लाटांना न जुमानता, अंगावर उसळणाऱया पाण्याची तमा न बाळगता रिव्हर राफ्टिंग करणं हा थरारून टाकणारा अनुभवच. हिंदूंचे पवित्र स्थान तसेच राफ्टिंगसाठीही सुप्रसिद्ध असणाऱया हृषीकेशमधली सैर रिव्हर राफ्टिंगचा चित्तथरारक, रोमांचक अनुभव देणारी ठरली. या प्रवासात नेहमी आनंद देणाऱया नदीने मला सागरासारखे अंतर्मुखही केले.

सागराची अथांगता आणि विस्तीर्णता आपल्याला अंतर्मुख करते. आपल्या खुजेपणाची जाणीव करून देते. समुद्र मला एखाद्या ऋषितुल्य व्यक्तित्त्वासारखा वाटतो, म्हणून त्याच्यासाठी त्या अनुषंगाने येणारे दूरत्वही मला नैसर्गिक वाटते. याउलट खळखळ वाहणाऱया नद्या मला खूपच आकर्षक वाटतात. असेच एकदा दूरचित्रवाणीवर मी नदीवर हेलकावे घेणाऱया एका राफ्टला (तराफा), 7-8 जणांच्या चमूचे, बेबंद लाटांना न जुमानता, अंगावर उसळणाऱया पाण्याची तमा न बाळगता वल्हवतानाचे परदेशातील दृश्य पाहिले आणि मी थरारूनच गेले. त्याला ‘व्हाईट वॉटर राफ्टिंग’ म्हणतात असे समजले. परंतु मी आणि राफ्टिंगचा प्रत्यक्ष अनुभव यांची गाठ पडायला अजून बऱयाच नद्या आमच्यामधून जायच्या होत्या! जेव्हा 2014 च्या मार्च महिन्यात उत्तराखंड राज्यात फिरायला जायचे ठरले तेव्हा नेहमीच्या नैनिताल वगैरेंवर शिक्कामोर्तब करताना, हिंदूंचे पवित्र स्थान असण्याबरोबरच राफ्टिंगसाठीही सुप्रसिद्ध असणारे हृषीकेश माझ्या डोळ्यासमोर लखकन चमकले. इथले राफ्टिंगचे दरही माझ्या कोकणस्थ (लग्नानंतरच्या!) मनाला खूप वाजवी वाटले! यथासांग फिरल्यावर आम्ही हृषीकेशला येऊन पोहोचलो. जेव्हा आम्ही संरक्षक जॅकेट आणि हेल्मेट घातले, हातात रबरी राफ्ट आणि वल्ही घेतली तेव्हाच एक विलक्षण सत्य माझ्या मनात चमकून गेले की, हो नाही करता करता आपले राफ्टिंग आता गंगानदीत होणार आहे! त्या क्षणी ‘उचंबळून येणे’ म्हणजे काय याचा मला प्रत्यय आला. आपल्या मनात गंगानदीचे स्थानच असे निर्माण करण्यात आले आहे की, ‘गंगा’ म्हणताच आपल्या मनात पावित्र्य, भक्ती याच भावना जागृत होतात. असे विचार करत असताना खाली खळाळणाऱया गंगेचे मनोहारी दर्शन होत होते. इथे नदी बरीच स्वच्छ असल्याने तिची ‘मूंह दिखाई’ प्रसन्न करणारी होती. थोडे चालल्यावर आम्ही राफ्टिंग जिथून सुरू करायचे तिथे पोचलो. पाण्यात पाय टाकण्याअगोदर आधी हातात पाणी घेऊन, ते डोक्याला लावून नदीचे आशीर्वाद घेतले आणि मार्गदर्शकाच्या सूचना ऐकायला आम्ही सज्ज झालो.

या मार्गदर्शक लोकांचं मला एक कौतुक वाटतं हं! ते त्यांच्या क्षेत्रात वाक्बगार असतात आणि आपण अगदीच नवखे आहोत याची त्यांना पुरेपूर जाणीव असते, तरीही ते ‘हे सगळं अगदी सोप्पं आहे’ असं सुरुवातीला सांगून आपल्याला या सर्व प्रयोगासाठी उत्सुक करतात आणि मग मधून मधून त्यातले काठिण्य, धोके यांची जाणीव करून देऊन आपल्याला कायम सजग ठेवतात! राफ्टिंगचं पूर्ण 12 कि.मी. वल्हवणं आम्ही मिळून करणार होतो. राफ्टमधून पडू नये म्हणून आमचं पाऊलच त्याच्या रचनेत असं चपखल ठेवायचं होतं की, आम्ही हलूच शकणार नाही. सर्वात पुढे आम्ही सगळे आणि सर्वात मागे मार्गदर्शक असे आम्ही सज्ज झालो.

भरदुपारी दोन्ही बाजूला असणाऱया उंच दगडांच्या रांगांमधून वाहत असलेल्या थंडगार प्रवाहातून आम्ही चाललो होतो. वल्हवताना वल्हं एका विशिष्ट कोनात धरून रेटलं तरच राफ्ट नीट पुढे जाते, नाहीतर पाणी नुसतंच मागच्याच्या अंगावर उडतं! मागे बसलेले मार्गदर्शक वेळोवेळी सूचना करत होते. नदीला स्वतःचा प्रवाह असला की वल्हवणं थांबवा, जरा संथ असली की चालवा वगैरे वगैरे.

राफ्टिंगचं खरं थ्रिल आहे रॅपिड्समध्ये. रॅपिड् (खळाळ किंवा द्रुतवाह) ही पाण्याला प्रचंड वेग असणारी नदीतली खडकाळ आणि खोल जागा असते. या जागी राफ्ट भयानक हेलकावे घेते, पाणी उसळ्या मारून आत शिरते, मार्गदर्शक जोरजोरात वल्हवण्यासाठी ओरडत असतो आणि तुम्ही जिवाच्या आकांताने तसा प्रयत्न करत असतात. राफ्ट पलटते की काय असेही वाटून जाते. तुमच्या किंकाळ्या, मार्गदर्शकाच्या सूचना आणि त्या प्रचंड आवेगाचा आवाज, एक वेगळाच हलकल्लोळ त्या क्षणी माजवून जातात. पाण्याचा वेग एवढा असतो की, तुमचं वल्हवणं पूर्णपणे अयशस्वी होत असतं आणि मग तुम्हाला जाणवतं की ‘वरचा’ मार्गदर्शक जसं आपल्याला कठीण समयी तारून नेतो, तसं यावेळी ‘मागच्या’ मार्गदर्शकाने आपल्याला तारून नेले आहे!

आमच्या या प्रवासात तीन रॅपिड्स होते आणि त्यांची व्याप्ती चढत्या क्रमाने सोपा, थोडा अवघड आणि सगळ्यात अवघड अशी असणार होती! पहिल्या रॅपिड्च्या वेळी मजा वाटते मग मार्गदर्शक सांगतो, ‘पुढचा अवघड आहे हं, मागच्या वेळी तीन जण बोटीतून पडले होते!’ तुम्ही सावध होता, पण चटक लागल्यासारखी दुसऱया रॅपिडची वाटही पाहता! प्रकरण वाटतं तेवढं सोपं नाही हे कळतं आणि तिसऱया वेळी तर तुम्ही जीवच मुठीत धरता! खरं सांगते, त्या क्षणी आपण फक्त स्वतःच्या जिवाचा विचार करतो, इतर कुणाचाही विचार मनात येत नाही. भान आल्यावर सर्वात आधी आठवली ती पाण्यात स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पिल्लाच्या डोक्यावर पाय ठेवणारी माकडीण! इथे तशी परिस्थिती नसली तरी स्वतःचा जीव सगळ्यात जास्त प्यारा असतो याची झलकच मिळाली. मार्च महिन्याच्या भरदुपारी वातावरण आणि गंगेचं पाणी दोन्ही थंडगार होते, पण आम्ही घामाने चिंब झालो होतो. सहीसलामत किनाऱयावर पोचल्यावर मार्गदर्शकाला मनापासून धन्यवाद दिले. शेवटी ‘किनारी पोचवणारा धनी’ तोच होता, वल्ही आमच्या हातात होती म्हणून काय झालं!

अशा तऱहेने रिव्हर राफ्टिंगचे माझे ‘घोडे’ एकदाचे ‘गंगेत’ (खरोखरच!) न्हाले होते. हा अनुभव विलक्षण होता. नेहमी आनंदच देणाऱया नदीने आज मला एका चित्तथरारक, रोमांचक अनुभवाबरोबर सागरासारखे अंतर्मुखही केले होते. तेव्हा ‘हेही नसे थोडके’ असे कदाचित नदीनेच मनात म्हटले असेल!

[email protected]