महिलेच्या हाताला पकडून ओढत नेणे विनयभंगच; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, गुन्हा रद्द करण्यास नकार

महिलेच्या हाताला ओढत नेणे हा विनयभंगच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने एका आरोपीचा विनयभंगाचा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला.

राजेंद्र जगताप असे या आरोपीचे नाव आहे. शिर्डी साईबाबा मंदिरातून एका महिलेला हाताला धरून बाहेर काढल्याचा जगतापवर आरोप आहे. पीडितेने नोंदवलेला गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका जगतापने केली होती. न्या. विभा कांकणवाडी व न्या. एस. जी. चंपळगावकर यांच्या खंडपीठाने वरील निर्वाळा देत ही याचिका फेटाळून लावली.

गुन्हेगारी दबाव

महिलेचा हात धरून ओढत नेण्याची कृती नेमकी कशासाठी होती, हे सिद्ध होणे आवश्यक आहे. मात्र हात धरून महिलेला ओढत नेणे हा विनयभंगाच्या व्याख्येतील गुन्हेगारी दबावच आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

काय आहे प्रकरण

जगताप साईबाबा मंदिरात कामाला होता. पीडिता नातलगांसोबत तेथे दर्शनासाठी गेली होती. तेथे जगताप आला व त्याने पीडितेला हाताला धरून बाहेर काढले. मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये अशी कोणतीच कृती दिसत नाही. असे कृत्य करण्याचा माझा कोणताच हेतू असू शकत नाही. हा गुन्हा व त्याचे दाखल झालेले आरोपपत्र रद्द करावे, अशी मागणी जगतापने याचिकेत केली होती.

सीसीटीव्हीमध्ये नेमके काय

महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सीसीटीव्हीमधील घटनेचा अहवाल सादर केला आहे. जगताप कोणाशी तरी बोलत असल्याचे दिसत आहे. अचानक त्यांचे बोलणे वाढले आहे. गर्दीमुळे तो नेमका कोणाशी बोलतोय हे कळत नाही. पीडिता तेथे दिसत आहे. काही वेळाने जगताप तेथून निघून गेला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अपशब्द उच्चारले

जगतापने पीडिता व अन्य महिलांबाबत अपशब्द वापरल्याचाही आरोप आहे. त्याची न्यायालयाने नोंद करून घेतली. विनयभंगाचा गुन्हा रद्द होईल असे हे प्रकरण नाही. ही याचिका फेटाळली जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.