मुंबईत 40 टक्के नालेसफाई पूर्ण, 373932.96 मेट्रिक टन गाळ काढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत या वर्षी उशिरा म्हणजे 5 एप्रिलला नालेसफाई सुरू झाल्यानंतर एक महिना होण्याआधी मोठे नाले, छोटे नाले आणि मिठी नदी मिळून 41 टक्के काम पूर्ण झाले आहे. पावसाळय़ाआधी उद्दिष्ट ठेवलेल्या 907160.96 मेट्रिक टन गाळापैकी आतापर्यंत 373932.98 मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे.

मुंबईत पावसाळय़ापूर्वी दरवर्षी मार्च महिन्यापासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली जाते. मात्र या वर्षी नालेसफाईचे काम उशिरा सुरू झाले. आयक्तांनी 5 एप्रिलला नालेसफाईच्या कामाची वर्कऑर्डर दिल्यानंतर वेगाने काम सुरू आहे. या वर्षी नालेसफाईचे काम 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्यात येत आहे. यानंतर आवश्यक त्या ठिकाणी वाढीव काम करण्यात येणार आहे. 31 मेपूर्वी 75 टक्के नालेसफाई पूर्ण करण्यासाठी दोन शिफ्टमध्ये काम सुरू करण्यात आले आहे. काम वेगाने व्हावे यासाठी मशीन्सची संख्याही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे 31 मेपूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. नालेसफाईनंतर काढलेला गाळ वेळेत हटवा तसेच सार्वजनिक बांधकाम खाते, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या अखत्यारीतील कामे तातडीने पूर्ण करावीत असे आदेश प्रशासनाने पंत्राटदारांना देण्यात आले आहे.

असे होतेय काम

दरवर्षी मार्चच्या मध्यावर सुरू होणारी नालेसफाई या वर्षी 15 दिवस उशिराने सुरू झाली असली तरी दिवसाला 16 तास काम, जादा मशिनरी आणि दोन महिन्यांचे काम एका महिन्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह यांनी याआधीच दिले आहेत. यानुसार नालेसफाईचे काम दर्जेदार होण्यासाठी कामावार उपायुक्तांचा समावेश असलेल्या भरारी पथकाची नेमणूकही आयुक्तांनी केली आहे.

आतापर्यंत झालेली नालेसफाई

शहर 14 टक्के
पूर्व उपनगर 38 टक्के
पश्चिम उपनगर 29 टक्के
मिठी नदी 78 टक्के