Dream Sports : ड्रीम स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या (DSF) वतीने ड्रीम स्पोर्ट्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन

ड्रीम स्पोर्ट्स ही हिंदुस्थानातील आघाडीची क्रीडा तंत्रज्ञान कंपनी आहे. या कंपनीच्या ड्रीम स्पोर्ट्स फाऊंडेशनने आज (2 एप्रिल 2024) रोजी ड्रीम स्पोर्ट्स अजिंक्यपद (DSC) स्पर्धेची घोषणा केली. ही राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा एप्रिल आणि मे महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. हिंदुस्थानातील विविध सहा शहरांमध्ये ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. देशातील 17 वर्षांखालील मुलांसाठी ही देशातील केवळ दुसरी स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधीत्व करु शकतील अशा गुणवान तरुण खेळाडूंचा शोध घेतला जाणार आहे.

देशातील युवा खेळाडूंना प्रेरित करणाऱ्या या स्पर्धेत प्राधान्याने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची (AIFF) मान्यता असलेल्या क्लब आणि अकादमींचे संघ सहभागी होतील. युवा खेळाडूंना सर्वोच्च स्तरावर आपले कौशल्य दाखविण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या स्पर्धेतून एआयएफएफच्या जूनमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय शिबिरासाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार असल्याने या स्पर्धेचे महत्व अधिक वाढते.

ड्रीम स्पोर्ट्स फाऊंडेशनने आगामी वर्षांत ड्रीम स्पोर्ट्स अजिंक्यपद स्पर्धेची व्याप्ती वाढविण्याची योजना आखली आहे. यामध्ये जास्तितजास्त क्रीडा प्रकारांचा समावेश करण्याचे आमचे उद्दिष्ट असेल. आगामी 2024 फुटबॉल आवृत्तीत प्रादेशिक फेरीच्या टप्प्याने या स्पर्धेच्या प्रवासास सुरुवात होईल. मुंबई, दिल्ली, शिलाँग, कोलकाता, बंगळुरु आणि गोवा या सहा शहरांमध्ये होणाऱ्या प्रादेशिक फेरीचा टप्पा 1 एप्रिल ते 18 एप्रिल या कालावधीत पार पडेल. त्यानंतर अव्वल आठ संघ मे महिन्यात मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय अंतिम फेरीत जातील. विशेष म्हणजे राष्ट्रीय फेरीचे फॅनकोडवरुन थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. यामुळे व्यापक प्रवेश आणि प्रेक्षकांची प्रतिबद्धता निश्चित होईल. कोलकाता आणि मुंबईतील टप्पा 1 एप्रिलपासून सुरु होईल. ही स्पर्धा अनुक्रमे 7 आणि 8 एप्रिलपर्यंत चालेल. स्पर्धेचे उर्वरित चार टप्पे शिलाँग, दिल्ली, बंगळुरु आणि गोवा येथे होतील.