
पालघरमध्ये काही दिवसांपूर्वी चोरीच्या संशयातून एका बस चालकाला काही अज्ञात इसमांनी मारहाण केली होती. मारहाणीनंतर पीडित इसमाला गुजरातमधील वलसाड येथील रुग्णालयात उपचासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी उपचारसदरम्यान या इसमाचा मृत्यू झाला आहे. रणजित पांडे असे मयत इसमाचे नाव आहे. याप्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पालघर पोलिस प्रवक्ते हेमंत काटकर यांनी दिली आहे. स्कूलबस चालकांच्या दोन गटातील व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. या पांडे यांच्यावर खोटा आळ घेऊन त्याला जमावाकून मारहाण करवण्यात आली. ज्यात त्याचा मृत्यू झाल्याचे कळाले आहे.
काटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 ऑगस्ट रोजी बस चालक रणजित पांडे हा बोईसर भागात बसजवळ उभा होता. त्यावेळी तिथे असलेल्या काही जणांना पांडे हा बसची बॅटरी चोरी करण्यासाठी आणि टायरमधून हवा काढण्यासाठी तिथे उभा असल्याचा संशय आला. या संशयावरून या इसमांनी पांडे याला पकडले आणि बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या पांडे यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना गुजरातमधील वलसाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले व तेथेच त्यांचा रविवारी मृत्यू झाला.
याप्रकरणी बोईसर पोलिसांनी सोमवारी अन्वर गर्गवाला, त्याचा भाऊ मिंटू, दोन साथीदार आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात आईपीसी कलम 302 (हत्या), 148 (बेकायदेशीरपणे जमा होणे ) आणि 177 (उपद्रव कारणीभूत) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही




























































