
राज्यात खासगी बसच्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बहुतांश अपघातांना चालक जबाबदार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चालकांची दृष्टी कशी आहे, त्यांना चष्म्याची गरज आहे का, आरोग्याची काही समस्या आहे का याची तपासणी करण्याचा निर्णय राज्याच्या परिवहन विभागाने घेतला आहे. त्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
राज्यात जवळपास एक लाखाहून अधिक खासगी लक्झरी बस असून त्या दररोज रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या मार्गावर चालवल्या जातात. त्यामुळेच खासगी लक्झरी बसला अपघात होत असून अनेकांचे नाहक बळी जात आहेत. त्याची परिवहन विभागाने गंभीर दखल घेतली असून बसला अपघात होण्याची कारणे त्यांनी शोधून काढली आहेत. त्यामध्ये डोळय़ांमधील दोष हे एक प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. त्याची दखल घेत परिवहन विभागाने बसचालकांच्या डोळय़ांची तपासणी करून आवश्यकतेनुसार चष्मा दिला जाणार आहे. तसेच गरजेनुसार पुढील उपचारासाठी सल्ला दिला जाणार आहे.
प्रत्येक आरटीओला पाच लाखांचा निधी
राज्यात पन्नास प्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. नेत्र तपासणीच्या शिबिरासाठी प्रत्येक आरटीओ कार्यालयाला पाच लाख रुपये एवढा निधी दिला जाणार आहे. दरम्यान, ज्या बसचालकांच्या डोळय़ांची तपासणी केली जाईल त्यांना त्याबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.




























































