
सामना प्रतिनिधी । हिंगोली
औंढा तालुक्यात दुष्काळाचे सावट असतांना गलांडी लघुसिंचन तलावाच्या लाभ क्षेत्रातील गलांडी येथील जनविकास पाणी वापर सहकारी संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडुन रितसर परवानगी मिळविल्यानंतरही तहसीलदारांनी पाणी रोखल्याने तलावातील पाणी द्या अन्यथा स्वेच्छा मरणाची परवानगी द्या असे निवेदन 20 शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्यासाठी स्वेच्छामरणाची मागणी करण्याची वेळ येऊनही प्रशासन कागदी घोडे नाचवत आहे.
औंढा शहरालगत असलेल्या गलंडी येथील तलावातून सिंचनासाठी पाण्याची मागणी शेतकऱ्यांनी जनविकास पाणी वापर संस्थेच्या माध्यमाने केली होती. जिल्हा प्रशासनाने या तलावात 55 टक्के म्हणजेच 0.187 दलघमी पाणीसाठा आहे. त्यातील एकूण 0.047 दलघमी पाणी सिंचनासाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्याना 19 डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण अधिकाऱ्यांनी कळविले होते. यानंतर तहसीलदारांनी गलंडी सिंचन तलावातुन पाणी रोखल्याने शेतातील पीके सुकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने 4 जानेवारी रोजी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने लघुसिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्र दिले आहे. तरीही या तलावातुन सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी 20 शेतकरी गेले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली नसल्याने पाणी द्या अन्यथा स्वेच्छा मरणाची परवानगी द्या अशा आशयाचे निवेदन त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांच्याकडे दिले. स्वेच्छा मरणाची परवानगी मागणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रकाश चव्हाण, धोंडीराज देव, नागनाथ पवार, धनंजय महामुने, विश्वनाथ साबळे, रंजनाताई पवार, एकनाथ शेळके, अशोक चव्हाण, प्रमोद देव, चंद्रप्रकाश साहेबराव, दिनकर कऱ्हे, शाम देव, किशन पवार, रामा पवार, बाबुराव पवार, सुभाष चव्हाण आदींसह 20 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




























































