
सामना ऑनलाईन,मुंबई
राज्यातील अपुरा पाऊस, वेगाने खालावलेली भूजल पातळी, आटलेल्या नद्या आणि खाली गेलेली धरणांची पातळी लक्षात घेऊन राज्याच्या महसूल व वन विभागाने आज अखेर राज्यातल्या 26 जिल्हय़ांतल्या 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. राज्यातील 112 तालुक्यांत गंभीर स्वरूपाचा व 39 तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. यापूर्वी राज्यात 2015-16 मध्ये दुष्काळ जाहीर केला होता. राज्यातील दुष्काळात सध्या शेतकरी व शेती होरपळून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाईचे केंद्र सरकारकडून किती पॅकेज जाहीर होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुष्काळ यादीत कोणत्या जिल्ह्यातील किती तालुके, वाचा सविस्तर नावं…
राज्यातील भीषण परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी शिवसेनेनेने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सतत दोनदा केली होती. यापूर्वी राज्य सरकारने 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना आठ प्रकारच्या विविध सवलती जाहीर केल्या होत्या. पण केंद्रीय निकषाप्रमाणे 31 ऑक्टोबरपूर्वी दुष्काळ जाहीर करणे आवश्यक होते. या तारखेच्या नंतर दुष्काळ जाहीर केला तर केंद्राकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीत तांत्रिक अडचणी निर्णाण होतात. त्यामुळे राज्याच्या महसूल व वन विभागाने संध्याकाळी तातडीने शासन आदेश जारी करून 2018च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे.
केंद्राकडून मागणी
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्यावर आता राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून राज्याला आर्थिक मदत देण्याची मागणी केंद्राकडे केली जाईल. केरळमध्ये नुकत्याच आलेल्या महापुरामध्ये पंतप्रधानांनी याच निधीतून केरळला आर्थिक मदतीचे पँकेज जाहीर केले होते. राज्य सरकारने प्रत्यक्ष दुष्काळ जाहीर करण्यापूर्वी ट्रिगर टू (दुसरी कळ) लागू झालेल्या 180 तालुक्यांतील पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्याच्या आधारे जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीकडून सादर झालेल्या अहवालानुसार राज्यात दुष्काळ जाहीर केला आहे.
मदतीचे आदेश जारी
आजपासून पुढील सहा महिन्यांपर्यंत दुष्काळ जारी राहील. या काळात दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना शेतसारा माफ, कृषिपंपांच्या वीजबिलांवर 33 टक्के सवलत, शेतकऱ्यांच्या मुलांना फीमाफी, रोजगार हमी योजनेत शिथिलता अशा योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
या जिह्यांत दुष्काळ नाही
- भंडारा, गोंदिया, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अकोला, गडचिरोली, ठाणे.
- गंभीर स्वरूपाचे दुष्काळग्रस्त जिल्हे व तालुके
- यवतमाळ – बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव, चंद्रपूर – चिमूर, नागपूरः काटोल, कळमेश्वर
मध्यम स्वरूपाचा दुष्काळ
- वाशीम – रिसोड,
- यवतमाळः केलापूर, मारेगाव, चंद्रपूर – ब्रह्मपुरी, नागभिर, राजुरा, सिंदेवाही.
- नागपूर – नरखेड, वर्धा – आष्टी, कारंजा, अकोला – बाळापूर, आर्शिटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा.
- अमरावती – अचलपूर, चिखलदरा, वरूड, अंजनगाव, सुर्जी





























































