बीड जिल्ह्यात दुष्काळाने होरपळ, गोशाळा संकटात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

बीड जिल्ह्यात पाच हजारापेक्षा अधिक गायीचे पालन विविध गोशाळेतून होत असल्याचे समोर आले असून सद्यस्थितीत या गायीच्या चारापाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. दहिवंडीच्या सय्यद शब्बीर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या गोशाळेसह जिल्ह्यातील अन्य गोशाळेची गंभीर स्थिती समोर आली असून सरकारच्या पुरस्कारापेक्षा या गोशाळांना भरीव मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.

शिरूर तालुक्यातील दहिवंडीच्या सय्यद शब्बीर यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी थेट त्यांच्या दहिवंडीच्या गोठावजा घरी जाणाऱ्यांची रीघ लागली आहे. जो तो शाल श्रीफळ पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कारात अन आपला फोटो काढून घेण्यात धन्यता मानत आहे. पण कुणीही त्यांच्या गायींसाठी चाऱ्याची मदत केली नाही. मोठे लोकप्रतिनिधी तर अद्याप दहिवंडीच्या दिशेने फिरकले सुध्दा नाहीत. जिल्हा प्रशासनाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी त्यांनाच बीडमध्ये आणून त्यांचा सत्कार केला.

आता यानिमित्ताने बीड जिल्ह्यातील अन्य गोशाळांची स्थिती देखील समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात चौसाळा येथील गोशाळा सर्वात मोठी आणि जुनी आहे तर काल प्रजासत्ताक दिनी शासकीय अनुदानातून राजेंद्र मस्केची गोशाळा सुरू झालीय,या दोन गोशाळा सक्षम आहेत कारण चौसाळ्याची गोशाळा जैन समाजसारखा सर्वार्थाने सक्षम समाज चालवतो आहे तर मस्केना राजकीय आणि शासकीय वरदहस्त मिळाला आहे, पण अन्य गोशाळांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळाची दाहकता वाढू लागली आहे, पाण्याचे स्रोत अटलेत, चारा संपलाय, गायी-वासरांना चरायला देखील रानात काही राहिले नाही. बीड जिल्ह्यात संजयमहाराज पाचपोर यांच्या प्रेरणेतून काही गोशाळा सुरू आहेत, ते त्यांच्या परीने या गोशाळांना दिलासा देतात पण त्यांनाही काही मर्यादा आहेत. विश्व हिंदू परिषदेची रामगडची गोशाळा, कामधेनू आरोग्यधाम गोशाळा, दराडेमहाराज गोशाळा, विजयकुमार बंब यांची गोशाळा, पाटंगणकर महाराजांची गोशाळा, पाणाची देवळाली येथील गोशाळा, शब्बीरमामुची गोशाळा, घाटनांदूर ता. परळी येथील गोशाळा, शंकर सुरवसे यांची बीड येथील गोशाळा, याज्ञेश्वरशास्त्री सेलूकर यांची खडकी घाट येथील श्रीरंग गोशाळा सध्या आपल्या परीने आणि मर्यादित शक्तीनुसार गायी सांभाळत आहेत. याशिवाय अन्य गोशाळा आपल्या परीने गायीचा सांभाळ करीत आहेत.