नांदेड जिल्ह्यात भीषण दुष्काळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय जोशी, नांदेड

धरण उशाला आणि कोरड घश्याला, अशी अवस्था नांदेड जिल्ह्याची झाली असून, निवडणुकीच्या काळात आलेली आचारसंहिता, मोठ्या बाष्पीभवनामुळे लहान,मोठे 112 प्रकल्प यांनी गाठलेला तळ, जनावरांच्या चाऱ्यांसाठी असुविधा आणि पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागात होत असलेला आक्रोश यामुळे नांदेड जिल्ह्यात यावर्षी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

नांदेड जिल्ह्यातील उमरी, लोहा, कंधार, मुखेड व देगलूरचा काही भाग हा दुष्काळाच्या कचाट्यात सापडला आहे. नांदेड जिल्ह्यात असलेले 112 छोटे, मोठे प्रकल्प या सर्वांनी आता तळ गाठला असून, सर्वात मोठ्या असलेल्या विष्णूपुरी व मानार प्रकल्पात देखील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. विष्णुपुरी प्रकल्पात ०.२५ टक्के, मानार प्रकल्पात 10.97 एवढा जलसाठा शिल्लक असून, गेल्या आठवड्यात नांदेडचे तापमान पहिल्यांदाच 45 पार केले. त्यामुळे बाष्पीभवनामुळे पाण्याची मोठी कमतरता या प्रकल्पात भासत आहे.

मध्यंतरी आलेल्या आचारसंहितेमुळे प्रशासनाचे झालेले दुर्लक्ष, परस्पर समन्वयाचा अभाव आणि टँकरची मागणी करुन सुध्दा अनेक गावांना टँकर न मिळाल्याने रानोमाळ भटवंâती करण्याची पाळी गावकऱ्यांना आली आहे. मुखेड या डोंगराळ तालुक्यात जवळपास 55 पेक्षा अधिक गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, याठिकाणी असलेले जलस्त्रोत कोरडे पडल्याने तसेच विंधन विहिरी आटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने वेगवेगळ्या योजनांच्या दुरुस्तीसाठी अहवाल तयार केला मात्र प्रशासनात असलेला समन्वयाचा अभाव यामुळे नांदेड, मुखेड, कंधार, लोहा, देगलूर, बिलोली, उमरी, हिमायतनगर या तालुक्यातील अनेक पाणीपुरवठा योजना बंद पडलेल्या अवस्थेत आहेत. ग्रामीण भागात असलेली लोडशेडींग व त्यामुळे निर्माण झालेली कृत्रिम पाणीटंचाई यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव या तालुक्यात देखील यावर्षी इसापूरचे पाणी जलपात्रात न आल्याने पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे. किनवट,माहूर तालुक्यात जनावरांच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था प्रशासनाने उपलब्ध न केल्याने मुकी जनावरे देखील त्रस्त झाली आहेत. यासोबतच जवळपास आठ तालुक्यात चाराटंचाईचे भीषण संकट ओढवले असून, गेल्या आठवड्यात झालेल्या मुंबई येथील बैठकीत पालकमंत्र्यांनी याबाबत गंभीर होण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. मात्र जिल्हा परिषद, कृषी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका यांच्यातील परस्पर समन्वयाचा अभाव सर्वत्र दिसून येत आहे.

मालेगाव, अर्धापूर, मुदखेड, लिंबगाव, भोकर तालुक्यातील बारडचा परिसर या भागात केळीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. मात्र यावर्षी पावसाळ्याअभावी तसेच इसापूरच्या कॅनलद्वारे येणारे पाणी मिळू न शकल्याने जवळपास 95 हेक्टरमधील केळी उद्ध्वस्त झाली आहे. चांगल्या प्रतीचे बियाणे आणि बेणे लावून केळीची लागवड झाली, मात्र यावर्षी पाण्याअभावी या केळीच्या बागा उदध्वस्त झाल्या आहेत. या भागातील केळी हे नगदी पीक मात्र शेतकऱ्यांच्या आशा भयानक दुष्काळामुळे आता ओसरल्या आहेत.

पाणीटंचाईच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनी आतापर्यंत तीनवेळा आढावा बैठका घेतल्या. मात्र टँकरची मागणी करुन सुध्दा तालुकास्तरावर टँकरच उपलब्ध होत नाहीत. ग्रामीण भागात पाणीटंचाईचे एवढे भयावह चित्र कधीही बघायला मिळाले नाही. टँकरचा आवाज येताच सगळी कामे सोडून नागरिक भांडी घेवून त्यामागे पळताना दिसतात. डोंगराळ भाग असलेल्या मुखेड, लोहा तालुक्यात तर तीन-तीन ते चार-चार किलोमीटरवरुन पाणी आणावे लागत आहे. त्यातच प्रचंड उन्हाळा आणि डोक्यावर उन घेवून पाण्यासाठी नागरिकांची केविलवाणी धावपळ सुरु आहे. हातपंपाच्या व विंधन विहिरीच्या संदर्भात नियोजन न केल्याने पाण्याची पातळी आता साडेतिनशे फुटाच्या खाली गेली आहे.

 नांदेडात भयावह परिस्थिती
यावर्षी विष्णूपुरी प्रकल्प काठोकाठ भरला. चारवेळा प्रकल्पातील पाणी गेट उघडून नदीच्या पात्रात सोडण्यात आले. दिग्रस बंधारा आणि इसापूर धरणातून देखील नांदेडकरांना पाण्याचा पुरवठा होता. मध्यंतरीच्या काळात शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी जवळपास 12 टीएमसी पाणी दिग्रस बंधाऱ्यातून आणले खरे, मात्र महापालिकेच्या प्रचंड गळती आणि पाणी वाया जाण्याच्या प्रकारामुळे गेल्या 40 वर्षात कधीही निर्माण झाली नव्हती अशी परिस्थिती नांदेडात झाली आहे. पहिल्यांदाच नांदेडकरांना यावेळी 1 जूनपासून पाच दिवसाआड पाणी मिळणार असून, बांधकामाच्यासाठी पाणी वापर आता बंद करण्यात आला आहे. शासनाने किवळ साठवण तलावाला मान्यता दिली खरी, मात्र त्यासाठीचा निधी अद्यापही उपलब्ध न झाल्याने त्याचेही काम रखडले आहे.

लहान,मोठ्या प्रचंड पाणी साठ्याचे नियोजन वेळीच करता आले असते तर आज जिल्ह्यावर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. विष्णूपुरी, उर्ध्व मानार प्रकल्पासह जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पात पाणीसाठा तळ गाठत आहे. जलसंधारणाच्या कामात देखील समन्वय नसल्यामुळे नाला सरळीकरण, खोलीकरण याबाबत ज्या वेगाने कामे व्हायला हवी होती ती होत नसल्याने नांदेड जिल्ह्यातील सिंचनाचा व पाणी साठविण्याचा प्रयोग असफल होत आहे. काही खासगी व सेवाभावी संस्थांनी नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकल्पात असलेला गाळ काढण्याचे काम सुरू केले असले तरी गोदावरीपात्रात मोठ्या प्रमाणात यांत्रिक पद्धतीने वाळू काढण्याचे प्रयोग होत असल्याने पाण्याचा साठा झपाट्याने कमी झाली आहे. म्हणतात ना, धरण उशाला आणि कोरड घश्याला अशीच अवस्था या जिल्ह्याची झाली आहे. येणाऱ्या काळात वेळेवर पाऊस न झाल्यास नांदेड जिल्ह्याची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.