
सामना प्रतिनिधी । बीड
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे काँग्रेसच्या जन संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेदरम्यान बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळसदृश्य असताना बीडच्या पालकमंत्री मात्र अदृश्य झाल्या आहेत. त्यांच्या या टीकेमुळे बीड भाजपात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पंकजा मुंडे बचत गटाच्या महिलांना घेऊन विदेशवारीवर गेल्या आहेत. म्हणूनच बीड जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना यावे लागले होते. राज्यात भीषण दुष्काळ असतांना पंकजा मुंडे यांच्या विदेशवारीवर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनीही टीका केली होती. आता काँगेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही तोफ डागली आहे.































































