
क्रूझ पार्टी प्रकरणी एनसीबीने गोरेगाव आणि सांताक्रूझ येथे कारकाई करून दोघांना अटक केली. शिवराज हरिजन आणि ओकारो ओझमा अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. एनसीबीने आतापर्यंत आर्यन खानसह 19 जणांना अटक केली आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणी एका आरोपीच्या चौकशीत ओकारोचे नाव समोर आले. त्यानंतर शनिवारी एनसीबीने गोरेगाव परिसरात छापा टाकून ओकारोला ताब्यात घेतले. त्याच्याकडून काही प्रमाणात कोकेन जप्त केले आहे. ओकारोच्या विरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याच सोबत एनसीबीने अरबाज मर्चंटच्या केलेल्या चौकशीत शिवराजचे नाव समोर आले. त्यानंतर एनसीबीने सांताक्रुझ येथे सापळा रचून शिवराजला ताब्यात घेत त्याच्याकडून 62 ग्रॅम चरस जप्त केले.
नायजेरियन कोकेन तस्कराला अटक
कोकेन विक्रीसाठी आलेल्या नायजेरियनला मालवणी पोलिसांनी अटक केली. गॉडविन चुकवू असे त्याचे नाव असून त्याच्याकडून पंधरा लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त केले आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मालवणी परिसरात एकजण कोकेन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी मालवणी गावातील वेलंकणी मंदिरासमोर सापळा रचून शनिवारी रात्री गॉडविनला ताब्यात घेतले.


























































