
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई युनिटने गेल्या दोन दिवसात वर्सेवा आणि मशीद बंदर येथे कारवाई करून मालिकेत काम करणारी एक अभिनेत्री, एक टांझानियन नागरिकासह पाच जणांना अटक केली. एनसीबीने कारवाई करून चरस, कोकेन एमडीएम जप्त केले.
नुकतेच एका अभिनेत्याच्या प्रेयसीच्या भावाला एनसीबी मुंबई युनिटने अटक केली होती. त्याच्या चौकशीत एनसीबीला काही माहिती मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीचे झोनल डायरटेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने गेल्या दोन दिवसात वर्सेवा आणि मशीद बंदर परिसरात सापळा रचला.
मशीद बंदर येथे सापळा रचून टांझानियन नागिरक असलेल्या ब्रुनो जॉनला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 4 ग्रॅम कोकेन जप्त केले. त्याच्या चौकशीनंतर एनसीबीने वर्सेवा परिसरात सापळा रचला. सापळा रचून रोहित हिरेला ताब्यात घेतले. रोहितकडून एनसीबीने एमडीएमए जप्त केले. त्याची कसून चौकशी केल्यावर एनसीबीच्या एका पथकाने दीपक राठोडला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 325 ग्रॅम गांजा चरस,एमडी आणि 12 हजार रुपये जप्त केले.
राठोडच्या चौकशीनंतर एनसीबीने वर्सेवा मच्छिमार नगर येथे सापळा रचला. सापळा रचून फैजलला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 99 ग्रॅम गांजा जप्त केला. त्याच वेळी एनसीबीने अभिनेत्री प्रितिकाला ताब्यात घेतले. फैजल हा प्रितिकाला गांजा विकत होता. त्या पाच ही जणांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.





























































