
कार्डेलिया क्रूझवरच्या ड्रग्ज पार्टीप्रकरणी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाचा जामीन अर्ज किल्ला कोर्टाने फेटाळून लावला आहे. जामीन अर्जावर सुनावणीचा अधिकार किल्ला कोर्टाला नसल्याने त्या तिघांच्या जामिनासाठी सत्र न्यायालयात अपील करावे लागणार आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने आर्यन, अरबाजला आर्थर रोड जेल तर मुनमुनला भायखळा महिला जेलमध्ये रात्र काढावी लागणार आहे.
क्रूझ पार्टी प्रकरणी एनसीबीने आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, विक्रांत छोकर, मोहक जसवाल, इस्मित सिंग, गोमीत सिंग, नूपुर सतीजाला अटक केली होती. त्या आठ जणांना गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्या सर्वांच्या जामिनासाठी आज किल्ला कोर्टात सुनावणी घेण्यात आली. दुपारी पावणेएकच्या सुमारास सुनावणीला सुरुवात होऊन सवादोनला सुनावणी थांबवली. त्यानंतर तीन वाजता पुन्हा सुनावणीला सुरुवात झाली. वकील सतीश मानेशिंदे यांनी आर्यनची तर एनसीबीच्या वतीने सहायक महाभियोक्ता अनिल सिंग यांनी बाजू न्यायालयात मांडली.
माने शिंदे यांनी आर्यनच्या जामिनासाठी कोर्टाकडे विनंती केली. त्यासाठी माने शिंदे यांनी 22 निकालांचा हवाला देखील दिला. आरोपीना जामीन देण्याचा अधिकार सत्र आणि हायकोर्टाला आहे. तेच अधिकार महानगर दंडाधिकाऱयांना देखील आहेत. आर्यनकडे काहीच सापडले नाही, त्यामुळे त्याला जामीन देण्यात यावा असा युक्तिवाद माने शिंदे यांनी केला. आर्यनचे चॅट्सशी निगडित काही सापडले असल्यास ते जामिनास पात्र आहेत. जामिनावर असल्यास तो चौकशीला सहकार्य करू शकतो. जेव्हा एनसीबी चौकशीला बोलावतील तेव्हा तो येण्यास तयार असल्याचा युक्तिवाद मानशिंदे यांनी केला. आर्यनच्या जामिनासाठी मानशिंदे यांनी नियमित आणि अंतरिम दिलासा देणारा जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला. ज्यामुळे आर्यनला जामीन मिळेल. पण एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल असल्याने त्याच्या जामिनासाठी एनसीबीने विरोध केला आहे.
आर्यनसह सहा जण आर्थर रोड जेलमध्ये
जामीन अर्ज फेटाळल्याने आर्यनसह सहा जणांना आर्थर रोड तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तर मुनमुन आणि नूपुरची रवानगी भायखळा महिला जेलमध्ये करण्यात आली आहे. आर्यनला आर्थर रोड जेलमधील क्वारंटाइन सेलमध्ये ठेवण्यात आले.

































































