Video – दारू पिऊन तर्राट झाला अन् BSNL टॉवरवर चढून झोपी गेला; नशा उतरताच सुटकेचा थरार सुरू झाला

>> प्रसाद नायगावकर

दारू पिऊन तर्राट झाल्यावर तळीराम काय करतील याचा नेम नाही. यवतमाळमध्ये दारूच्या नशेमध्ये मोहन नावाचा एक तरुण 100 मीटर उंच बीएसएनलच्या टॉवरवर चढला आणि झोपी गेला. तब्बल 6 तासांनी जाग आल्यावर आपण ‘हवेत’ असल्याचे कळताच त्याची दारू सरकन उतरली.

वरतून तळपते ऊन, 6 तासांपासून पोटात पाण्याचा थेंब नाही आणि त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास. शरीरात त्राणही उरले नसल्याने खाली कसे उतरायचे हा प्रश्न होता. तोपर्यंत मोहन बीएसएनएलच्या टॉवरवर अडकल्याची वार्ता गावभर पसरली आणि सुरू झाला त्याला खाली उतरवण्याचा प्रवास.

यवतमाळमधील मेडिकल कॉलेज चौकात वावरणारा मोहन दारव्हा मार्गावरील बीएसएनएलच्या टॉवरवर चढला. दारूच्या नशेमध्ये त्याला तिथेच झोप लागली. दुपारी दोनच्या सुमारास जाग आल्यानंतर त्याने आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर गावकऱ्यांना मोहन टॉवरवर अडकल्याचे लक्षात आले. त्याला खाली उतरवण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. लाऊडस्पिकरवरून त्याला सूचनाही देण्यात आल्या. मात्र 6 तासांपासून पोटात पाण्याचा थेंबही नसल्याने मोहनच्या अंगात खाली उतरण्याचे त्राण उरले नव्हते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

डिहायड्रेशनमुळे मोहनची प्रकृती बिघडत चालली होती. त्यामुळे टॉवरवरून एकट्याने खाली उतरणे त्याला शक्य नव्हते. त्यामुळे परिसरातील तरुणांनी टॉवरवर चढून त्याला खाली उतरवण्याचे ठरवले. सरसर करत तरुण टॉवरवर चढले आणि मोहनला खांद्यावर घेऊन खाली आले. त्यानंतर त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असून मोहनची सुटका झाल्याने प्रशासनानेही सुटकेचा निश्वास टाकला.