
जेम्स बाँड चित्रपटातील दृश्य प्रत्यक्षात हैदराबादमध्ये घडले आहे. हैदराबाद पोलिसांनी एका मद्यधुंद डाॅक्टरला बीएमडब्लू चालवताना अडवले. गौतम रेड्डी नामक डाॅक्टरला शनिवारी रात्री हैदराबादच्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या ज्युबिली हिल्स भागात नियमित तपासणी दरम्यान पोलिसांनी अडवले. पोलिसांनी डाॅक्टरला नियमानुसार ‘ब्रेथ-अॅनालायझर’ (मद्यपान चाचणी) देण्यास सांगितले. त्यानंतर त्या डाॅक्टरने जे केले ते पाहून पोलिसही अवाक् झाले. त्याने वाहतूक अधिकाऱ्यांना चकवा देण्यासाठी एका रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने कारची नंबर प्लेट तत्काळ बदलली. हे पाहताच पोलिसही गांगरले.
रेड्डीच्या बीएमड्ब्लू कारमध्ये एका बटणाच्या साहाय्याने चालणारी, नंबर प्लेट बदलण्याची (flip number plate) विशेष यंत्रणा बसवण्यात आली होती. या यंत्रणेमुळे चालकाला अवघ्या काही सेकंदातच दोन वेगवेगळ्या नोंदणी क्रमांकांच्या प्लेट्समध्ये बदल करणे शक्य होत असे. जेणेकरून पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांना देखील चकवा देता येईल. त्याचबरोबर ई-चलान देखील टाळता येईल. हे सर्व अगदी जेम्स बाॅडच्या चित्रपटाला साजेसे असेच होते.
बनावट नंबर प्लेट हे सर्व आम्हाला नवीन नाही. परंतु अशा पद्धतीने आधुनिक यंत्रणेचा वापर करून, यंत्रणेची दिशाभूल टाळण्यासाठी केलेला हा प्रयत्न सुनियोजित आहे अशी माहिती ज्युबिली हिल्स पोलीस स्टेशनचे निरीक्षक (वाहतूक) एन. रवींद्र यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे अशा पद्धतीचे बदल खासगी कार डेकोर युनिटमध्ये करण्यात आले आहेत. त्यामुळेच अशा बेकायदेशीर पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तींची देखील आता चौकशी सुरू आहे.
प्रसंगी पकडले गेलेल्या, डॉक्टरांच्या रक्तातील अल्कोहोलची पातळी देखील कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त होती. या झालेल्या घटनेनंतर डाॅक्टरवर फसवणूक आणि बनावट ओळख वापरण्याच्या कलमांतर्गत, तसेच मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, बीएमडब्ल्यू गाडी पुढील तपासणीसाठी जप्त करण्यात आली आहे. तसेच न्यायवैद्यक तपासणीसाठी वाहन जप्त करण्यात आले आहे.



























































