शीव येथील डी.एस. मराठी हायस्कूलकडे विद्यार्थ्यांचा ओढा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशासाठी झुंबड उडत असताना शीव येथील डी. एस. हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी-पालकांचा ओढा वाढतच आहे. ‘प्रयोगशील शाळांच्या’ पंगतीत बसणाऱ्या या शाळेतील शिक्षकांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांमुळे मे महिन्यात तब्बल 300 पटसंख्येचा पल्ला शाळेने गाठला आहे. जूनपर्यंत यात आणखी भर पडेल, असा विश्वास शाळाचालकांनी व्यक्त केला.

शीव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलमध्ये मात्र मे महिन्याच्या मध्यापर्यंत 300 शाळाप्रवेश झालेले आहेत. शाळेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी याविषयी सांगितले, ‘बहुसंख्य मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये पूर्वी दोन-तीन हजार विद्यार्थी शिकत होते, तेथे आज जेमतेम 800 ते 1200 विद्यार्थी शिकत आहेत. काही शाळांची पटसंख्या तर 500 पेक्षा खाली आली आहे. अशा स्थितीत डी. एस. हायस्कूलच्या पटसंख्येचा स्तर उंचावत आहे.’

शिक्षकांचे ‘मिशन ऍडमिशन’

डी. एस. हायस्कूलच्या शिक्षकांनी राबविलेले ‘मिशन ऍडमिशन’ विद्यार्थी संख्या वाढीसाठी फायदेशीर ठरले आहे. जानेवारी महिन्यापासूनच शाळेतील सुमारे 85 शिक्षकांनी धारावी, प्रतीक्षानगर, चुनाभट्टी परिसरातील असंख्य पालकांशी थेट संपर्क साधला. लोकांना शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यासाठी विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शाळेतील शिक्षक सहभागी झाले आणि तिथे उपस्थित पालकांना त्यांनी शाळेतील खेळ, कला, संगीत, तंत्रज्ञान आदींशी संबंधित उपक्रमांची माहिती दिली.

डी. एस. हायस्कूलचा आतापर्यंतचा पट

  • वर्ष               पटसंख्या
  • 2016-17        415
  • 2017-18        450
  • 2018-19        480
  • 2019-20        300 (प्रवेश प्रक्रिया सुरू)