‘आधी पाणी द्या, मग मत मागा‘; निवडणुकीच्या तोंडावर मराठवाडय़ात पाणी प्रश्न पेटणार

एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना राज्यभरातील धरणांचा पाणीसाठा आटल्यामुळे राज्यातील 22 जिह्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. राज्यात मराठवाडय़ात पाण्याचा प्रश्न भीषण झाला असून धाराशीवमधील काजळा गावातील ग्रामस्थांनी तर ‘आधी पाणी द्या आणि मग मत मागा,’ अशी कठोर भूमिका घेत लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांची काsंडी केली आहे.

जागतिक तापमानवाढीचा फटका देश आणि राज्यालाही बसत असून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमान 40 डिग्री सेल्सिअसहून जास्त झाले आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत असल्यामुळे आणि बाष्पीभवनाचा वेगही वाढत आहे. त्यामुळे धरणे आटली तर नद्या सुकल्या आहेत तर तलाव कोरडेठाक पडले आहेत. राज्यात केवळ 39.76 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यातच मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील तब्बल 22 जिह्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. मराठवाडय़ात पाण्याचा प्रश्न भीषण झाला असून पाण्यासाठी गावकऱयांना पायपीट करावी लागत आहे.

पाणी विकत घ्यावे लागते

काजळा गावाची लोकसंख्या जवळपास सात हजारांच्या घरात असून गावाला 15 दिवसांतून एकदा नळाला पाणी येते. तेही 10 ते 15 मिनिटे. पाणी कोणालाही पुरत नाही. काही घरांमध्ये 10 ते 15 माणसे आहेत. त्यामुळे अधिकच्या वापरासाठी ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागते.

टँकर मंजुरी कागदावरच

काजळा गावासाठी दोन पाण्याचे टँकर मंजूर झाल्याचे गावकरी सांगतात, पण हे टँकर कागदोपत्री मंजूर झाले आहेत. त्यातून प्रत्यक्षात पाणी आतापर्यंत मिळालेले नाही. त्यामुळे निवडणुका कोणत्याही असो आधी पाणी प्रश्न मार्गी लावा, असे म्हणत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

उमेदवारांना गावबंदीची भीती

गावचा पाणी प्रश्न सोडवा, ही एकमुखी मागणी असल्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांची मोठी काsंडी झाली आहे. मते मागणार कशी, प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतरही ग्रामस्थ मते देतील का, तात्पुरती व्यवस्था म्हणून गावाला टँकर पुरवठा करता येईल का, त्यासाठी पुन्हा वेगळा निधीची व्यवस्था करावी लागले, असा प्रश्नांनी उमेदवारही चिंतेत पडले आहेत. पाणी प्रश्नाला बगल देता येणार नाही, मात्र पाणी प्रश्न सुटला नाही तर ग्रामस्थ गावबंदी करतील का, अशी भीतीही उमेदवारांना वाटू लागली आहे.