
सामना प्रतिनिधी, धुळे
स्वतंत्र खिडक्या ठेवण्याची मागणी
दि. 5 (प्रतिनिधी) ः शहरातील रेल्वे स्थानकावर एकमात्र खिडकी सुरू असून प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. प्रत्यक्षात रेल्वे स्थानकात चार खिडक्या आहेत, पण एकाच खिडकीतून सर्व कामकाज चालविले जात असल्याने नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सोय करण्यासाठी आरक्षण, तिकीट विक्री आणि चौकशीसाठी स्वतंत्र खिडक्या ठेवाव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
धुळे शहरातील रेल्वे स्थानकावरून सध्या चाळीसगावपर्यंत पॅसेंजरच्या चार फेऱया होतात. चाळीसगाव येथून निरनिराळय़ा रेल्वेसाठी प्रवाशांना प्रवास करता येतो. सकाळच्या सत्रात धुळ्याहून चाळीसगावकडे गेल्यावर भुसावळ पॅसेंजर, काशी एक्सप्रेस या रेल्वे मुंबईकडे जाण्यासाठी तर भुसावळकडे जाण्यासाठी काशी पॅसेंजर, सचखंड एक्सप्रेस, कामयानी एक्सप्रेस, पवन एक्सप्रेस या रेल्वे चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून उपलब्ध होतात. याशिवाय चाळीसगाव रेल्वे स्थानकावरून अमृतसर एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, हावडा मेल, पंजाब मेल, जनता एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस या रेल्वे उपलब्ध होतात.
धुळे रेल्वे स्थानकावर केवळ एकच खिडकी सुरू असते. प्रत्यक्षात या ठिकाणी चार खिडक्या आहेत. आरक्षण करायचे असो की तिकीट काढायचे असो किंवा साधी चौकशी करायची असो प्रत्येकाला खिडकी समोर रांगेत उभे रहावे लागते. त्यामुळे सर्वाच्याच वेळेचा अपव्यय होतो. प्रत्यक्षात रेल्वे स्थानकावर चार खिडक्या आहेत पण त्यातील तीन बंद असतात. प्रवाशांनी अनेकदा अडचणींचे पाढे वाचले. पण रेल्वे प्रशासन लक्ष घालत नाही. सध्या सुट्टीचा कालावधी सुरू झाला आहे. किमान हंगामाच्या काळात तरी आरक्षण, तिकीट विक्री, चौकशी यासाठी स्वतंत्र खिडक्या कार्यान्वित कराव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांची आहे.
एकच खिडकीला परवानगी
धुळे रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता धुळ्याहून मुंबई व्यतिरिक्त इतर गावांना जाण्यासाठी आरक्षण तिकिटांची जादा मागणी नसते. सध्या एकच खिडकी सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने दिलेली आहे. या खिडकीवरून आरक्षण करता येते. इतर खिडक्या कायम बंद नसतात, असे देखील सांगण्यात आले.



























































