मूकबधिरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । धुळे 

बदलत्या परिस्थितीत अनेक मूकबधिर शिक्षित झाले आहेत. त्यामुळे त्यांचे शिक्षण लक्षात घेऊन नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी मूकबधिरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल, अशा प्रतिक्रिया मूकबधिरांनी निवेदनात नोंदविल्या आहेत.

जागतिक मूकबधिर दिनानिमित्त न्याय्य हक्क प्रस्थापित होण्यासाठी जिह्यातील मूकबधिरांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. जिह्यातील सुमारे पाचशे मूकबधिर तरुण-तरुणींनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. मूकबधिरांच्या बाबतीत अनेक कल्याणकारी योजना आहेत, पण प्रत्यक्षात त्यांना लाभ मिळत नाही. याशिवाय मूकबधिरांवर वेळोवेळी अन्याय, अत्याचार होतात याची दखल घेतली जात नाही.

धुळे शहरात अलीकडेच सना खातून या मूकबधिर तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. अत्याचार करणाऱयांना गजाआड करावे. तिच्या कुटुंबीयांना शासनाने मदत करावी, सरळ सेवा भरतीची जाहिरात काढून मूकबधिरांना कनिष्ठ सहाय्यक परिचर येथे संधी द्यावी, जिह्यात कर्णबधीर आणि मूकबधिरांसाठी उच्च शिक्षणाची सोय करण्यात यावी, लेखी परीक्षा न घेता मुलाखतीद्वारे निवड व्हावी, अनुकंप तत्त्वावर मूकबधिर आणि दिव्यांगांना संधी द्यावी, स्थानिक स्वराज्य संस्थांना दिव्यांग आणि मूकबधिरांवर पाच टक्के निधी खर्च करण्यास भाग पाडावे, शासकीय कार्यालयांजवळ मूकबधिरांना व्यवसायासाठी जागा द्यावी, अशा मागण्या असलेले निवेदन या वेळी देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व ऍड. उमाकांत घोडराज, ऍड. राहुल वाघ, ऍड. विशाल साळवे यांनी केले.