पद्मदुर्ग किल्यावर दोन तोफांच्या दुर्गापन सोहळा उत्साहात साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

छत्रपती शिवाजी महाराजानी बांधलेल्या मुरुड समुद्रातील किल्ले पद्मदुर्ग किल्ल्यावर लोकवर्गणीतून दोन तोफगाडे दुर्गापन सोहळा शेकडो मावळ्यांच्या उपस्थितीत सहयाद्री प्रतिष्ठानच्या पुढाकारने उत्साहात साजरा करण्यात आला. किल्ल्याची स्वच्छता आणि संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे जिल्ह्यातील किल्यावर विविध उपक्रम राबविण्यात येतात.

मुरुड समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी जंजिरा किल्यावर लक्ष ठेवण्यासाठी पद्मदुर्ग किल्ला बांधला होता.पद्मदुर्ग किल्यावर 41 तोफा असून जंजिरा किल्यावर मारा करण्यासाठी या तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र, काळाच्या ओघात या तोफांची झीज झाली असून त्यांची बिकट स्थिती झाली आहे. या तोफेच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. पद्मदुर्ग किल्ल्यावरील पाकळी बुरुज आणि मुख्य किल्ल्यातील बुरुजावर 3 ते 4 टन एवढ्या वजनाच्या 8 फूट लांब अशा दोन तोफा जंजिरा किल्ल्यावर लक्ष ठेऊन मारा करण्यासाठी आजही सज्ज आहेत. काळाच्या ओघात या तोफांची जरी झीज झाली असली तरी या तोफांचे संवर्धन व्हावे म्हणून या तोफांना नवसंजीवनी मिळावी यासाठी सहयाद्री प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. चाळीसगाव येथील अजय जोशी यांनी किल्ल्यातील सर्वात मोठ्या दोन तोफांना तीनचाकी आणि चार चाकी बसवून या तोफांचे तोफगाडे बनविले आहेत. हे तोफगाडे रविवारी किल्यावर बसविण्यात आले आहेत. हा तोफांचा दुर्गापन सोहळा उत्साहात करण्यात आला.

पद्मदुर्ग किल्ल्यात जवळपास 41 तोफा असून त्यांची अवस्था सध्या वाईट आहे काही तोफांची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. सहयाद्री प्रतिष्ठान वेळोवेळी अलिबागमधील किल्ल्याच्या संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य पुरातत्व विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार करत आहे. तसेच कुलाबा किल्ल्यावर 3 तोफांना तोफगाडे बसविण्यात आले आहेत. मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा पद्मदुर्ग उर्फ कासा किल्ला यावर पर्यटन वाढावे आणि या किल्याची डागडुजी व्हावी अशी अपेक्षा सह्याद्री प्रतिष्ठाणची आहे. या सोहळ्यात मुरुड नगराध्यक्ष स्नेहा पाटील, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत जोत्याजीची भूमिका करणारे गणेश लोनरे हे उपस्थित होते. तर लायजी सरपाटील यांचे वंशज प्रकाश सरपाटील, शिवसेना मुरुड शहर प्रमुख आशील ठाकूर, मंगेश चव्हाण हे प्रमुख अतिथी उपस्थित होते. सकाळी आई कोटेश्वर देवी पूजन करून तोफगाड्यांचे पूजन झाले त्यानंतर मान्यवरांचे सन्मान व मनोगत झाले संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी आभार प्रदर्शन केलं. यावेळी 350 शिवप्रेमी या दुर्गापण सोहळ्यात उपस्थित होते. अशी माहिती अलिबाग विभाग अध्यक्ष संजय पाडेकर व गणेश रघुवीर यांनी दिली.