पश्चिमरंग – विल्यम टेल ओव्हर्चर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दुष्यंत पाटील

ऑपेराच्या कथानकाचं सार सांगणारं संगीत म्हणजे ओव्हर्चर जे ऑपेराच्या सुरूवातीला येते. स्वित्झर्लंडच्या स्वातंत्र्यलढय़ाला प्रेरणा देणारा विल्यम टेल याची कथा संगीतकार रोझिनीने या ओव्हर्चरमधून मांडली

स्वित्झर्लंडमधल्या एका लोकप्रिय दंतकथेमध्ये त्यांचा लाडका नायक विल्यम टेल येतो. या दंतकथेप्रमाणं विल्यम टेल चौदाव्या शतकातला तिथला एक कुशल शिकारी होता. या काळात स्वित्झर्लंडच्या भूमीवर परकीय सत्तेचं चक्र चालू होतं. जेस्लर नावाचा क्रूर शासक या काळात तिथं लोकांवर जुलूम करायचा. कथेप्रमाणं शहराच्या मध्यभागी त्यानं एक काठी उभी केली होती. या काठीवर त्यानं स्वतःची टोपी अडकवली होती. रस्त्यावरून जाणाऱया प्रत्येक नागरिकानं या टोपीला गुडघे टेकून नमस्कार करायचा त्याचा हुकूम होता ! हा हुकूम न पाळणाऱया लोकांना जबर शिक्षा व्हायची. त्यामुळे लोक इच्छा नसली तरी या टोपीला नमस्कार करायचे.

आपल्या मुलाला घेऊन विल्यम टेल हा शिकारी काही कारणांमुळं शहरात आला होता. टोपीला नमस्कार करताना त्यानं आपल्या मुलाला अडवलं. त्यानं स्वतःही नमस्कार केला नाही आणि मुलालाही करू दिला नाही. ही बातमी पटकन जेस्लरच्या कानावर गेली. विल्यम टेल आणि त्याच्या मुलाला अटक करण्यात आली.

विल्यमला एक आदेश देण्यात आला. सर्व लोकांसमोर त्याच्या मुलाच्या डोक्यावर एक सफरचंद ठेवण्यात आलं. काही अंतरावरून विल्यमला या सफरचंदावर नेम धरून बाण मारण्याचा आदेश देण्यात आला. नेम चुकला तर विल्यमला आणि मुलाला शिक्षा मिळणार होती! विल्यमचा बाण अचूकपणे सफरचंदावर गेला! तिथं जमलेल्या साऱया मंडळींना खूप आनंद झाला, पण विल्यमनं तयार ठेवलेल्या दुसऱया बाणाचं कारण विचारल्यावर विल्यमनं सांगितलं की, पहिल्या बाणानं आपल्या मुलाला कसलीही इजा झाली असती तर दुसऱया बाणानं तो अचूकपणे जेस्लरला संपवणार होता! या उत्तरानंतर विल्यमला पकडण्यात आलं. त्यानंतरच्या कथेप्रमाणं विल्यम त्यांच्या तावडीतून सुटतो. त्याचा पाठलाग करताना वादळ येतं. तो जेस्लरला ठार करतो.

असं मानण्यात येतं की, विल्यम टेलमुळं स्वित्झर्लंडच्या स्वातंत्र्य लढय़ाला प्रेरणा मिळाली आणि नंतरच्या काळात स्वित्झर्लंड स्वतंत्र झाला. विल्यम टेलची कथा खरी आहे की, खोटी ते नक्की सांगता येणार नाही, पण तिथल्या लोकांमध्ये ही कथा खूप लोकप्रिय आहे हे नक्की.

1829 च्या दरम्यान फ्रान्समध्ये या कथेवर आधारित एक ऑपेरा बनवला गेला. ऑपेराच्या सुरुवातीला ओव्हर्चर संगीत येतं. आजच्या काळात चित्रपटाच्या सुरुवातीला येणाऱया थीम संगीतासारखाच हा प्रकार असतो. ऑपेराच्या साऱया कथानकाचं सार संगीतकाराला या ओव्हर्चरमध्ये संगीतातून सादर करावं लागतं. विल्यम टेलच्या कथानकाचं सार संगीतकार रोझिनीला ओव्हर्चरमध्ये आणायचं होतं.

रोझिनीनं या ऑपेरासाठी जवळपास 12 मिनिटांचं ओव्हर्चर लिहिलं. यात स्वित्झर्लंडमधल्या हिमाच्छादित आल्प्स पर्वतांमधलं लोकांचं आयुष्य प्रतिबिंबित होत होतं. या 12 मिनिटांच्या ओव्हर्चरमध्ये 4 रचना एकामागोमाग एक अशा सलगपणे येत होत्या. पहिल्या रचनेत पर्वतावरच्या जीवनातली पहाट येत होती. दुसऱया रचनेत वादळ दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. यात वाद्यवृंदातल्या साऱया वाद्यांचा सुरेख वापर केलेला होता. वादळ शमल्यानंतर हिरव्या कुरणांमधल्या गाईंशी संबंधित तिसरी रचना होती, तर चौथ्या रचनेत स्वित्झर्लंडच्या सैनिकांचं लयबद्ध संचालन (March) येत होतं!

यातली चौथी रचना आजही प्रचंड लोकप्रिय आहे! ‘The Lone Ranger’ नावाच्या गाजलेल्या हॉलीवूडपटात ही रचना थीम संगीत म्हणून वापरली गेली. त्यातला हिरो घोडय़ावरून बंदूक घेऊन जाताना या रचनेचं पार्श्वसंगीत यायचं. यानंतर ‘The Lone Ranger’ या चित्रपटाशी ही रचना इतक्या घट्टपणे जोडली गेली की, या रचनेचा ‘The Lone Ranger’ या चित्रपटाशिवाय विचार करू शकणाऱया माणसाला बुद्धिमान मानण्यात यायला लागलं! या चित्रपटाशिवायही ही रचना कित्येक जाहिरातींमध्ये, टीव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये वापरली गेली.

जवळपास 200 वर्षांपूर्वी एका ऑपेरामध्ये थीम संगीतासारख्या असणाऱया ओव्हर्चरमध्ये वापरलं गेलेलं हे संगीत आजपर्यंत इतकं लोकप्रिय का असावं हे अनुभवण्यासाठी Youtube वर जाऊन आपण William Tell Overture एकदा तरी ऐकायलाच हवं!

[email protected]