डावखुर्‍या फलंदाजांवर अंकुश

58

>>द्वारकानाथ संझगिरी  

इंग्लंडमध्ये वर्तमानपत्र वाचणं हा एक वेगळा आनंद असतो. रंजक बातम्या, ज्ञान वाढवणारी माहिती आणि एखाद्या गोष्टीचे काटेकोर विश्लेषण.

एक रंजक बातमी सांगतो आणि दुसरं बुद्धिमान विश्लेषण. एक वयोवृद्ध स्त्रीची बातमी, दुसरं क्रिकेटचं विश्लेषण.

यूकेमधली सर्वात ज्येष्ठ नागरिक नुकतीच ख्रिस्तवासी झाली. काय वय असेल? फक्त 113 वर्षे! एकेकाळी इंग्लंडची राणी एखाद्या व्यक्तीने आयुष्याचं शतक ओलांडलं की पत्र पाठवत असे. तिने आता पत्र पाठवणं थांबवलं. का? तर शतक पूर्ण करणार्‍या व्यक्ती आता प्रचंड प्रमाणावर सापडतात. आधुनिक विज्ञान, स्वच्छ हवा आणि उत्तम वैद्यकीय सोयींचा परिणाम आहे.

असो. इतकं मोठ्ठं आयुष्य म्हणजे किती किती गोष्टी तिने पाहिल्या पहा. इंग्लंडचे पाच राजे पाहिले. 27 पंतप्रधान पाहिले. 1904 साली तिचा जन्म झाला. त्याच साली टीबॅगचा शोध लागला. तिने दोन महायुद्धे पाहिली. साम्यवादाचा उदय पाहिला. एकतृतीयांश युरोप साम्यवादी झालेला पाहिला. बर्लिनमध्ये भिंत उभी राहिलेली पाहिली. आणि मग कोसळलेली पाहिली. युरोपमधून साम्यवाद उखडलेला पाहिला.

आणि तंत्रज्ञानाचा विचार करा. तिने रेडिओचा जन्म पाहिला. वॉशिंग मशीनचा पाहिला. तरीही घरची कामे तिने स्वतःच्या हाताने केली. आयुष्यात वॉशिंग मशीन कधी वापरले नाही. स्वतः विणलेले लोकरीचे कपडे घातले. आणि स्वतः स्वयंपाक करताना इलेक्ट्रिक फूड मिक्सर कधी वापरला नाही.

आणि हे असं आगळंवेगळं शतक ठोकलं. सुनील गावसकर म्हणायचा की, एकेरी-दुहेरी धावा ही त्याची मीठ-भाकर होती. चौकार-षटकारांची कसोटीतली आतषबाजी हा वनडे, टी-20 परिणाम आहे. त्या 113 वर्षांच्या ऑलिव्ह बोअरने सुनील गावसकरसारखं शतक ठोकलं. परंपरागत तत्त्वांना कवटाळत.

आता सर्वाधिक वयाच्या विक्रमाकडे सरकतोय. वुस्टर शायरची ग्रेस कॅथरीन जोन्स. ती अवघी 111 वर्षांची आहे.

आता क्रिकेटकडे वळतो.

इंग्लंडच्या संघात गेल्या कसोटीत सात डावखुरे फलंदाज होते. त्यामुळे इथला एक प्रथितयश क्रिकेट लेखक आणि खेळाडू सिमॉन हय़ुजला एक विश्लेषण करावंसं वाटलं. अतिशय रंजक असं ते विश्लेषण आहे.

जगात फक्त दहा टक्के लोकसंख्या डावखोरी आहे. पण क्रिकेटमधल्या सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीतले पहिले दहा फलंदाज पाहिले तर त्यात निम्मे डावखुरे फलंदाज सापडतात.

असं का, तर त्याची विविध कारणे दिली जातात. त्यातली दोन म्हणजे, ते पायचित फार कमी वेळा होतात आणि उजव्या हाताच्या गोलंदाजाकडून त्यांना ऑफ स्टम्पच्या बाहेर फटके मारायला चेंडू मिळतात. मुख्य म्हणजे शास्त्रज्ञांचे मत आहे की, गतिमान वस्तूच्या बाबतीत डावखुरी माणसं जास्त वेगवान हालचाली करू शकतात. मग त्यांच्यावर अंकुश कसा ठेवायचा? तर त्यांना अधिकाधिक राउंड द विकेट गोलंदाजी करायची. अर्थात उजव्या हाताच्या गोलंदाजांनी! 2005 साली ऍणड्र्यु फ्लिनटॉफने हा डावपेच ऍडम गिलख्रिस्टसाठी वापरला आणि त्या ऍशेस मालिकेत गिलख्रिस्टच्या फटक्यांच्या ‘मुसक्या’ बांधल्या. त्याची धावांची सरासरी फक्त 22 होती. एकही अर्धशतक त्याला ठोकता आले नाही.

हा डावपेच आता किती यशस्वीपणे वापरला जातो, यासाठी तो या वर्षीच्या सामन्यांची आकडेवारी देतो. तो म्हणतो, ‘उजव्या हाताच्या गोलंदाजांनी डावखुर्‍या फलंदाजाला जे चेंडू टाकले त्यात 46 टक्के राउंड द विकेट होते. 2013 साली हीच आकडेवारी फक्त 22 टक्के होती. अगदी हिंदुस्थान-इंग्लंड मालिकेत वरच्या सहा डावखुर्‍या फलंदाजांना फक्त एक अर्धशतक करणं जमलंय, त्याचं महत्त्वाचं कारण हे वाढलेलं प्रमाण.

अर्थात उजव्या हाताच्या गोलंदाजांना राउंड द विकेट टाकणं सोपं नसतं. या मालिकेत ते इशांत शर्मा आणि ब्रॉडला उत्तम जमलं. राउंड द विकेट आल्यामुळे चेंडूचा कोन बदलतो. स्क्वेअरकट मारणं कठीण होतं. आणि जेनिंग्जसारखा फलंदाज चेंडू सोडून देतो तो आत येऊन मागच्या पायाला लागतो. बुमराहनेसुद्धा हा सराव वाढवल्याचे जाणवते. अर्थात त्यामुळे बुटमार्कनी पॅचेस तयार होतात ते फिरकी गोलंदाज वापरतात. पण त्यासाठी तुमच्याकडे हुशार गोलंदाज असावा लागतो. जो त्या ‘ऑमलेट’ पॅचचा चांगला उपयोग करू शकतो. नाहीतर मॅच आणि मालिका जाते आणि आपण हरतो.

आपली प्रतिक्रिया द्या