हिंदुस्थान विश्वचषक जिंकू शकतो का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

द्वारकानाथ संझगिरी

अजूनही हिंदुस्थानी क्रिकेट चाहत्यांना हिंदुस्थानी संघ विश्वचषक जिंकू शकतो यावर विश्वास नाहीए. हा विश्वास का डळमळीत आहे?
तसं पाहिलं तर जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज हिदुस्थानकडे आहे – विराट कोहली. जगातला सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज हिंदुस्थानकडे आहे. – जसप्रीत बुमरा.
नुसत्या युक्तीच्या चार गोष्टीच नाहीत तर चक्क शस्त्र धरणारा श्रीकृष्ण हिंदुस्थानकडे आहे – महेंद्रसिंह धोनी.

सातत्याने गेली दोन वर्षे हिंदुस्थानी संघ इंग्लंडमध्ये खेळतोय. त्यामुळे इंग्लिश भूमी आता तशी परकी नाही. इंग्लिश वातावरण ही अचंबित करणारी गोष्ट नाही. तरीही हा निराशावादी दृष्टिकोन आहे.

कारण चेंडू गळय़ापर्यंत वेगात उसळला, हवेत हलला तर आपली फलंदाजी कोसळू शकते ही भीती आहे. विराट कोहली हा प्रत्येक वेळी हरक्युलस होऊ शकत नाही. थोडक्यात हिंदुस्थानी फलंदाजीबद्दल म्हणजे धावा उभारण्याच्या त्याच्या कुवतीबद्दल त्यांना शंका वाटते. त्यात विश्वचषकाच्या सुरुवातीलाच आशियातल्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. पाकिस्तानने जे घालीन लोटांगण सुरू केले त्याचं पुढचं कडवे न्यूझीलंडविरुद्ध श्रीलंकेने म्हटलं आणि अफगाणिस्तानने हरे राम हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण, कृष्ण हरे पूर्ण केलं. आपलंही तसं होईल का, ही भीती आहे. त्यात तीन सामने सोडले (दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान) तर हिंदुस्थानचे सर्व सामने लंडनच्या उत्तरेला आहेत. लंडनच्या ओव्हलची खेळपट्टी पहिल्या मॅचमध्ये पाटा वाटली. पण श्रीलंका खेळली त्या खेळपट्टीवर गवत होतं. पावसाळी ढगांना तर तुम्ही अडवूच शकत नाही आणि उत्तरेत त्यांचं अस्तित्व अंमळ जास्त असतं. हे सर्व जमेत धरलं तरी मला हिंदुस्थानी फलंदाजीच्या कतृत्वाची एवढी भीती वाटत नाही.

अफगाणिस्तान हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं बाळ आहे. श्रीलंकेचा संघ किशोर अवस्थेत आहे आणि पुरुष व्हायला धडपडतोय. त्यांचे दहा खेळाडू प्रथमच विश्वचषक खेळतायत. आपलं तसं नाहीय. आपण पुरुष आहोत आणि पुरुषार्थ गाजवू शकतो आणि गाजवूही (बाळ विराटा, माझे दात माझ्या घशात घालू नकोस हं). इंग्लंडमध्ये सुरुवातीला रोहितने सेट होईपर्यंत थोडं सांभाळून खेळायला हवं. कारण सेट झाल्यावर रोहित शर्मा हा मोठी खेळी खेळू शकतो आणि सेट झाल्यावर तो जगातल्या कुठली गोलंदाजीसमोर डोळय़ाला पट्टी लावून स्ट्राईक रेट वाढवू शकतो. त्या वेळी त्याच्या बॅटने चेंडूला मारलेली फुंकर ही वादळी फुंकर असते. वाटतं ही प्रेमाची आहे, पण चेंडू क्षणात सीमापार जातो.

चौथा क्रमांक हा अजून तसा डगमगता आहे. राहुल त्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. पण राहुलची एखाद्या खेळीतली डोळे चमकावणारी गुणवत्ता आणि धावांचं सातत्य याचं व्यस्त प्रमाण आहे. एक चांगली खेळी झाल्यावर ‘आता राहुल फॉर्मात आलाय’ असं छातीठोकपणे म्हणणं कठीण जातं. कारण तो कधी माती खाईल हे सांगता येत नाही.

बरं त्यानंतर आपले अष्टपैलू खेळाडू सुरू होतात धोनी, जाधव, पंडय़ा (गरीबांचा कपिलदेव) वगैरे! धोनी आता पूर्वीचा धोनी राहिलेला नाही. हे धोनीही कबूल करेल. तो तसा राहिला असता तर देव चुकला असं म्हणायला लागलं असतं. पण तारुण्याची जागा अनुभव भरून काढतो. म्हणून अजूनही धोनी फलंदाजीला येताना त्याच्याबरोबर आशेची ज्योत चालताना दिसते. जुन्या आठवणीत घेऊन जाण्यासाठी ती अधूनमधून प्रज्वलित होते. पण आणीबाणीत तेवढय़ावर आपलं भागेल काय, हा मोठा प्रश्न आहे. जाधव हा ऍम्ब्युलन्सची भूमिका चोख पार पाडतो. पंडय़ा खाली कशी फलंदाजी करेल यावर आपलं बरंच अवलंबून राहील. पंडय़ाकडे फलंदाजीची मोठी कच्ची गुणवत्ता आहे. ती या विश्वचषकात जास्त प्रगल्भ व्हायला पाहिजे. निदान गरीबांच्या कपिलवरून त्याला मध्यमवर्गीयांचा कपिल एवढी बढती द्यायची इच्छा व्हायला हवी आणि हे सर्व घडताना रोहित नाही तर विराट निदान 45 षटकांपर्यंत हवेत. अपेक्षा जास्त आहेत. पण अनाठायी नाहीत. काय वाटतं?

[email protected]