आजपासून ‘ई–कॉमर्स’वर केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे विक्रीला बंदी

2816

ऍमेझॉन, फिल्पकार्ट, स्नॅपडिल यासारख्या ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांना 20 एप्रिलपासून फक्त खाद्यपदार्थ, औषध आणि वैद्यकीय उपकरणे या जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीस परवानगी देण्यात आली आहेत. इतर वस्तू विकता येणार नाहीत. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने सुधारीत आदेश जारी केला आहे.

20 एप्रिलपासून देशातील कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या भागातील शेती उद्योग, ग्रामीण भागातील उद्योग, बांधकाम प्रकल्प, काही स्वयंरोगार सेवा सुरू करण्यात येणार आहेत, असे केंद्र सरकारने यापूर्वी जाहीर केले आहे. त्यात ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांच्या सेवांचाही समावेश होता. मात्र, आज गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी सुधारीत आदेशाबाबत माहिती दिली. लॉकडाऊनच्या काळात ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांना अनावश्यक वस्तूंच्या विक्रीस बंदी कायम राहील. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीस आणि जीवनावश्यक वस्तूंची ने-आण करणाऱया वाहनांना परवानगी देण्यात येईल.

‘ई-कॉमर्स’ कंपन्यांना या वस्तू विकता येणार
– खाद्य अन्न, औषधे आणि वैद्यकीय उपकरण़े
या वस्तू विकता येणार नाहीत
– ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांना ऑनलाईन पद्धतीने मोबाईल फोन, टिव्ही, लॅपटॉप, फ्रिज, कुलर आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू, चपला, बूट, कपडे आदी वस्तूंची विक्री करता येणार नाही. त्यामुळे या वस्तुंची ये-जा करणाऱया वाहनांनाही बंदी कायम आहे.

काँग्रेसने मानले सरकारचे आभार
‘ई-कॉमर्स’ कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीस परवानगी देण्याच्या निर्णयाबद्दल काँग्रेस पक्षाने समाधान व्यक्त करीत केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. 25 मार्चपासून देशभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. देशातील सात कोटी दुकाने बंद आहेत. जर ‘ई-कॉमर्स’ कंपन्यांना ऑनलाईन वस्तू विक्रीस परवानगी दिली असती तर या व्यापाऱयांवर मोठा अन्याय झाला असता. मात्र, सरकारने वेळीच दुरुस्ती करून ई-कॉमर्स कंपन्यांनबाबत नवा आदेश जारी केला. त्याबद्दल आभारी आहोत, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या