
मुंबई पालिकेने रीसतर ई-टेंडर काढून आणि शिवसेनेच्या पाठपुराव्याने झालेल्या कामांवरही भाजपकडून नाहक आक्षेप घेतला जात आहे. मात्र शिवसेनेने पुराव्यांसह भाजपच्या आरोपांची हवाच काढून टाकली. स्थायी समितीच्या माध्यमातून होणाऱया निधीवाटपावरून भाजपकडून थयथयाट केला जात आहे. मात्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याबाबत पुराव्यानिशी स्पष्टीकरण देत भाजपचा भंडाफोड केला.
मुंबईत विकासकामांकरिता स्थायी समितीच्या माध्यमातून सर्वच पक्षांना नगरसेवकांच्या प्रमाणात दरवर्षी ठरावीक निधीचे वाटप केले. यानुसार 97 नगरसेवक असलेल्या शिवसेनेला 232 कोटी, 83 नगरसेवक असलेल्या भाजपला 90 कोटी आणि प्रति नगरसेवक 1 कोटी याप्रमाणे एपूण 173 कोटी रुपये, 29 नगरसेवक असलेल्या काँग्रेसला 70 कोटी, राष्ट्रवादीला 20 कोटी, समाजवादी पक्षाला 18 कोटी निधी देण्यात आला आहे.
या निधीमधून प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागात आवश्यक कामे करण्यासाठी निधी मिळतो. यामध्ये स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या वॉर्ड क्र. 209 साठी सुमारे 23 कोटींचा निधीमधून विकासकामे आणि लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. मात्र ही कामे स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्या विभागासाठी जादा निधी घेऊन केल्याचा आरोप भाजपचे पालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केला आहे. मात्र विनोद मिश्रा यांनी जाणीवपूर्वक आणि केवळ शिवसेनेची बदनामी करण्यासाठी आरोप केला असल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले. आपल्या विभागासाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी संबंधित नगरसेवकाचा पाठपुरावा महत्त्वाचा असतो, असे यशवंत जाधव यांनी सांगितले.
अशी झाली लोकोपयोगी कामे
आपल्या विभागासाठी मिळालेल्या निधीमधून विभागातील गरजू बचत गटांसाठी फूड व्हॅन, शिलाई मशीन्स, झेरॉक्स मशीन्स, विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप, नागरिकांना ज्युटच्या पिशव्यांचे वाटप असे अनेक उपक्रम राबविण्यात आले. यासाठी पालिकेच्या माध्यमातून ई-निविदा प्रक्रिया राबवून काम देण्यात आले. गेल्या एप्रिलपासून ही कामे करण्यात आली. म्हणजेच कायदेशीर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या हक्कानुसार निधी वाटप झाले असताना भाजपकडून केवळ शिवसेनेची बदनामी करण्यासाठीच कारस्थान रचल्याचे यशवंत जाधव यांनी स्पष्ट केले. योग्य वेळी भाजपचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.






























































