
पाकिस्तान पुन्हा एकदा भूकंपाने हादरला असून लाहोरमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यावेळी झालेल्या पडझडीत 32 नागरिक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मीरपूरमधील नागरिकांची संख्या अधिक आहे. या भूकंपाची तीव्रता 4.7 रिश्टर स्केल एवढी होती. तसेच या भूकंपाचा केंद्रबिंदू मीरपूर असल्याचे अमेरिकेच्या भूगर्भ तज्ज्ञांनी सांगितले आहे.
हिंदुस्थानी वेळेनुसार दुपारी 12.31 वाजता हा भूकंपाचा हादरा बसला आहे. भूकंपाच्या या धक्क्यामुळे पाकव्याप्त कश्मीरसह त्याच्या आजूबाजूच्या भागातही भूकंपाचाचे धक्के जाणवले. पाकिस्तानला मंगळवारीही भूकंपाचा जोरदार हादरा बसला होता. यावेळी इनेक इमारती आणि बैठ्या घरांना तडे गेले. तर काही ठिकाणी घरांची पडझड झाली. त्यात 32 जण जखमी झाले आहेत. या भूकंपाने पाकव्याप्त कश्मीरजवळील मीरपुर, झेलम, आणि शेखपुरा भाग हादरवून टाकले आहे.
पीओकेमध्ये मंगळवारी झालेल्या विनाशकारी भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 38 झाली असून जखमींचा आकडा 452 वर पोहचली आहे. जखमींमध्ये अनेकजणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भूकंपाच्या हादऱ्याने पाकिस्तानमधील इस्लामाबाद, पेशावर, रावलपिंडी, आणि लाहोरसारखी प्रमुखे शहरही हादरली होती. या भूकंपाचे झटके नवी दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानमध्येही जाणवले होते.


























































