
रविवारी सायंकाळी 6.20 मिनिटांनी शहराच्या काही भागात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या भूकंपमापक यंत्रावर या धक्क्याची नोंद 1.5 रिश्टर स्केल एवढी झाल्याचे जनसंपर्क अधिकारी अशोक कदम यांनी सांगितले.
रविवारी सायंकाळी आयटीआय, शिवाजीनगर, काबरानगर भागात भूकंपाचा धक्का जाणवला. भूगर्भातून आवाज येताच लोक घरातून बाहेर पडले. एकच पळापळ उडाली. भूकंपाचा धक्का जाणवताच आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सूचना दिल्या. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी राष्ट्रीय विज्ञान सूचना केंद्राशी संपर्क साधून माहिती घेतली. भूकंपाचा सौम्य धक्का असल्याने घाबरण्याचे कारण नाही, त्यामुळे लोकांनी गोंधळून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.























































